धक्कादायक; कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञालाच कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:25 PM2020-06-03T12:25:29+5:302020-06-03T12:28:39+5:30
सोलापूर शासकीय रूग्णालयातील अलर्ट; काही काळासाठी प्रयोगशाळा बंद
सोलापूर: सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञालाच बाधा झाल्याने निर्जंतुकीकरणासाठी काही काळ प्रयोगशाळा बंद राहिल्याने मंगळवारी अनेक अहवाल प्रलंबित असल्याचे दिसून आले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रयोगशाळेत काम करणाºया एका तंत्रज्ञाला त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचे स्वॅब घेऊन तपासणी केल्यावर तो बाधित आढळला आहे. यामुळे सोमवारी सायंकाळनंतर प्रयोगशाळेचे काम बंद करून निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे मंगळवारी प्रयोगशाळेचे कामकाज उशिरा सुरू झाल्याने अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
सोमवारी फक्त १६० अहवाल तपासण्यात आले. आलेल्या स्वॅब तपासणीसाठी तंत्रज्ञ नसल्याने व निर्जंतुकीकरण्यासाठी प्रयोगशाळा लवकर बंद करण्यात आल्याने ८३४ अहवाल प्रलंबित राहिले. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित आकडेवारीबाबत प्रतीक्षा राहिली. जिल्हा प्रशासनातर्फे सकाळच्या सत्रात रात्रीच्या तपासणीतील आकडेवारी जाहीर केली जाते. पण मंगळवारी जाहीर करण्यासाठी आकडेवारीच नव्हती. जिल्हा प्रशासनाने आकडेवारी रात्री उशिरा जाहीर केली.
११ जणांचे घेतले स्वॅब
महापालिकेतील एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले. तो अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातही शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आरोग्य अधिकाºयांसमवेत आला होता. वरिष्ठ अधिकाºयांसह ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.