रोगाशी दोन हात; कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी पॉझिटिव्ह विचार करायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:13 AM2020-06-10T11:13:00+5:302020-06-10T11:16:09+5:30
सोलापुरातील कोरोनामुक्त पोलीस अधिकाºयाचा संदेश; नियमित व्यायाम अन् सकस आहार घेतला
सोलापूर : ज्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असे समजले तेव्हा तर भीतीने गाळण उडाली. पण पत्नीने धीर दिला, पॉझिटिव्ह आहात तर पॉझिटिव्ह विचार करा. बस्स, तेव्हापासून मनोमन ठरविले अन् रुग्णालयात १७ दिवस उपचार घेऊन बरे होऊन घरी परतलो, असा अनुभव सांगत आहेत, सोलापूर ग्रामीण पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील एक सहायक फौजदार.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रामीण पोलीस मुख्यालयामधील दोन पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् यांच्या संपर्कात आलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, मंद्रुप, सांगोला, बार्शी पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात वडकबाळ येथील नाकाबंदीतील सहायक फौजदारास बरूर येथे क्वारंटाईन केल्यावर ५ मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कुंभारीतील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरातील व्यक्तींची तपासणी केल्यावर पत्नी, दोन मुलींनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
पॉझिटिव्ह रिपोर्ट ऐकून आधी अंगावर काटा उभा राहिला, पण पत्नीने धीर दिला. पत्नी व मुलींना सर्दीचा त्रास होताच. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळाल्यावर नाराज झालो. डॉक्टर, नर्स नियमित तपासणी करून औषधे देत होते. सकस आहार, नियमित व्यायाम आणि औषधोपचाराने आम्ही कोरोनावर मात केली, असेही ते म्हणाले.
अनेकांनी काळजी घेतली
- मी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर अधिकाºयांनी औषधोपचाराची काळजी घेतली. टॉनिक, काढा व इतर औषधे पुरविली. आता मी, पत्नी व दोन मुलींनी कोरोनावर मात केली आहे.