coronavirus; कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या ७० टक्के घटली
By Appasaheb.patil | Published: March 19, 2020 11:04 AM2020-03-19T11:04:22+5:302020-03-19T11:07:05+5:30
मध्य रेल्वे; आरक्षण केंद्र, तिकीट घर, प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट; मुंबई, पुण्याला जाणाºया रेल्वे गाड्या रिकाम्या
सुजल पाटील
सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. शासनाने रेल्वे गाड्या रद्द, मंदिरे, पर्यटनस्थळे बंद केल्याने रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या कमी झाली आहे़ बुधवारी व गुरूवारी सोलापूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण केंद्र, तिकीट खिडकी व प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट दिसत होता़ दरम्यान, कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत ७० टक्के परिणाम झाला असून, बुधवारी दुपारी पुण्याला गेलेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसमधील ५३० हून अधिक सीट्स प्रवाशांविना होत्या, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज किमान ९२ मेल, पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्या धावतात़ या गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात; मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून या प्रवाशांची संख्या लाखोंतून हजारोत आली आहे़ देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी जास्त होत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे़ परिणामी त्याचे पडसाद रेल्वे स्टेशनसह एसटी बसस्थानकावर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ एरव्ही प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल असलेले रेल्वेस्थानक, बसस्थानकावर तुरळक प्रवासी दिसून येत आहेत.
या सर्व गोष्टींचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. एरव्ही सोलापूर एसटी बसस्थानक व रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. दोन्ही स्थानकांवर पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरूच असते, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून या वर्दळीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. नेहमीपेक्षा निम्मेही प्रवासी या दोन्ही स्थानकांवर दिसेनासे झाले आहे. अनेक रेल्वे गाड्या व एसटी बस किरकोळ प्रवासी घेऊन धावताना दिसत असून, बुधवारी सोलापूरच्या रेल्वे स्थानकाहून सुटणाºया गाड्यांमध्ये म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही.
खिडक्या प्रवाशांविना....
- एरव्ही रेल्वे आरक्षण व तिकीट काढण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर असलेले आरक्षण केंद्र व तिकीट घरात शुकशुकाटच दिसत होता़ एरव्ही प्रवाशांनी गच्च भरलेले हे दोन्ही केंद्र बुधवारी निर्मनुष्य दिसून आले़ तिकीट खिडकी व आरक्षण केंद्रात रेल्वे कर्मचारी तोंडाला मास्क लावून काम करीत असल्याचे दिसून आले; मात्र प्रवाशांची गर्दीच नसल्याने रेल्वे अधिकारी अन्य कामात व्यस्त होते़
रेल्वेचे उत्पन्न घटले...
- उन्हाळ्यात प्रवासी पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देतात़ त्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात रेल्वेने प्रवास करणाºयांची संख्या अधिक असते़ पुढील प्रवासाचे नियोजन करून त्या नियोजनानुसार तिकीटही काढले जाते़ मात्र कोरोना या विषाणूबद्दलची चिंता केव्हा मिटणार हे माहितच नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रवासासह आरक्षणाकडे पाठ फिरविली आहे़ त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात घट झाली आहे़ शिवाय मालवाहतुकीवर देखील परिणाम झाल्याने त्यातून मिळणारे रेल्वेला उत्पन्नही कमी झाले आहे़