आता तीस मिनिटांत कळणार कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह की निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:07 AM2020-07-07T11:07:57+5:302020-07-07T11:10:04+5:30
रॅपिड अॅन्टीजन किटचा प्रयोग करण्याचे नियोजन; पहिल्या टप्प्यासाठी ५० हजार किटची आॅर्डर
सोलापूर : सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे व साथीवर नियंत्रण आणण्यासाठी रॅपिड अॅन्टीजन किटचा प्रयोग करण्याचे नियोजन करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यासाठी ५० हजार किटची आॅर्डर देण्यात आली आहे.
कोरोनाच्या मृत्यूमध्ये सोलापूर तिसºया क्रमांकावर आहे. ही बाब अत्यंत चिंतादायक असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दौरा केला अन् पुण्याच्या धर्तीवर रॅपिड अॅन्टीजन किट वापरून चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे महापालिकेने या किटच्या खरेदीची आॅर्डर दिली असल्याची माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
या किटची किंमत सुमारे पाचशे रुपये असून, एक लाख किट खरेदीसाठी पाच कोटी रुपये लागणार आहेत. महापालिकेकडे इतके पैसे नसल्याने जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५० हजार किट खरेदीचे नियोजन केले असून, त्यासाठी अडीच कोटी मोजावे लागणार आहेत.
काय आहे रॅपिड किट
संशयित रुग्णांचे स्वॅब संकलित करून तातडीने प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. स्वॅबचे द्रव या किटमध्ये घातल्यावर अर्ध्या तासात रिझल्ट येतो. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तातडीने समजते. स्वॅब दिलेल्या रुग्णाला जागेवर किंवा घरीच थांबवून निर्णय घेता येणे शक्य आहे. यामुळे एखाद्या भागातील सर्व नागरिकांची तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण वेगळे करून हा भाग संसर्गमुक्त करता येणे शक्य होणार आहे.