सोलापुरातील कोरोना कमी होतोय; पॉझिटिव्हपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 12:27 PM2021-05-21T12:27:00+5:302021-05-21T12:27:06+5:30
कोरोना कमी होतोय : चाचण्यांच्या प्रमाणात बाधित येत आहेत कमी
सोलापूर : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेला महिनाभर लागू केलेल्या संचारबंदीचा परिणाम आता दिसत आहे. जिल्ह्यात गुरूवारी १३ हजार चाचण्यांत १ हजार ६४१ बाधित आढळले तर ३२ जणांचा मृत्यू झाला. याउलट १ हजार ७०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने गुरूवारी १० हजार ३९४ चाचण्यांचे अहवाल जाहीर केले. यामध्ये १ हजार ५६९ जण पॉझिटिव्ह आले तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ८४२ तर मृतांची संख्या २ हजार ३३९ इतकी झाली आहे. बुधवारी १ हजार ५७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अशाप्रकारे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९३ हजार ५२९ इतकी झाली असून, सध्या फक्त १६ हजार ९७४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तर मरण पावलेल्यांमध्ये पंढरपूर तालुक्यातील देगाव, विटे, खरसोळी, गोकुळ नगर, तपकिरी शेटफळ, भक्तीमार्ग, सांगोला रोड, मनीषा नगर, सेन्ट्रल नाका, मोहोळमधील समर्थ नगर, मंगळवेढ्यातील शनिवार पेठ, आंधळगाव, तळसंगी, सिद्धनकेरी, मरवडे, खोमनाळ, दक्षिण सोलापूरमधील पिंजारवाडी, चिंचपूर, शिंगडगाव,तांदुळवाडी, फताटेवाडी, मंद्रुपमधील व्यक्तींचा समावेश आहे.
महापालिका आरोग्य विभागाने ३ हजार ६ चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध केले. यामध्ये ७२ जण पॉझिटिव्ह तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ हजार ७६२ तर मृतांची संख्या १ हजार ३३४ इतकी झाली आहे. बुधवारी १३४ जण कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या २५ हजार ४९८ इतकी झाली आहे. शहरात सध्या फक्त ९३० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत ग्रामीणचा पॉझिटिव्हचा दर १५.०९ तर शहराचा केवळ २.३९ टक्के इतका आहे. शहरात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण झपाट्याने कमी येत आहे. ग्रामीणमध्येही आता फरक दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे आशादायी चित्र यामुळे दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
मृत्यूंची नोंद येतेय उशिरा
ग्रामीणमध्ये मृत्यूंची नोंद आठ दिवस उशिराने येत असल्याचे दिसून आले आहे. गुरूवारच्या अहवालातील मृत्यू हे १२ ते १५ मे पर्यंतचे सर्वाधिक आहेत. शहरातील नोंदीही दि. १५ व १६ मेच्या आहेत. शासनाच्या पोर्टलवरील नोंदीत व दरराेज जाहीर होत असलेल्या अहवालातील नोंदीत मोठा फरक दिसून येत आहे.