कोरोनामुळे गावोगावची कामे सुरू होण्यापूर्वीच रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:38+5:302021-05-28T04:17:38+5:30
या कामांमध्ये ११७ गावांतील विविध ठिकाणचे रस्ते दुरुस्ती, नव्याने रस्ते बनविणे, अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करणे, आरोग्य ...
या कामांमध्ये ११७ गावांतील विविध ठिकाणचे रस्ते दुरुस्ती, नव्याने रस्ते बनविणे, अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करणे, आरोग्य विभागाच्या नूतन इमारती बांधणे, शाळा खोल्या नव्याने बांधणे, काही खोल्यांची दुरुस्ती करणे, जनसुविधा योजनेंतर्गत कामे, २५१५ हेडवरील विविध कामे, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नव्याने इमारती बांधणे यासाठी तब्बल २७ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती स्तरावरून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कामे करू इच्छिणारे ठेकेदार पंचायत समितीच्या आवारात हेलपाटे मारत असल्याचे दिसत आहेत.
अतिवृष्टीच्या पुरामुळे अनेक गावांचे रस्ते वाहून गेले. त्यासाठी २ कोटी ९७ लाख, ३०५४ हेडअंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी ४ कोटी ८५ लाख, ५०५४ या हेडअंतर्गत रस्त्यासाठी २ कोटी २० लाख, रस्ते विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी, २५१५ हेडअंतर्गत कामांसाठी २ कोटी ५९ लाख, जनसुविधा योजनांतर्गत १ कोटी ७५ लाख, विविध शाळांच्या वर्गखोल्या बांधकामासाठी २ कोटी २४ लाख, तर खोल्या दुरुस्तीसाठी ७२ लाख, नवीन अंगणवाड्या इमारत बांधकामासाठी ४२ लाख रुपयांचा निधी तालुक्याला मिळाला आहे.
कुर्डूवाडी परिसरातील ३६ गावांतील रस्ते दुरुस्तीसाठी १ कोटी १५ लाख रुपये, म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी ४ कोटी ५० लाख, भोगेवाडी उपकेंद्रासाठी ६५ लाख मंजूर झाले आहेत. तर बुद्रुकवादी उपकेंद्र बांधकाम ६० लाख, अरण आयुर्वेदिक दवाखान्यासाठी ४९ लाख, पशुवैद्यकीय दवाखाना वाकाव ४० लाख, टेंभुर्णी ४० लाख, माढा ४० लाख, वरवडे १५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा सर्व निधी आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाला आहे.
कोरोनामुळे कामे ठप्प आहेत. कोरोनाच्या अटी व नियम घालून वरिष्ठांनी ई टेंडर करण्यास परवानगी देऊन कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी गावातील पदाधिकारी व ठेकेदारांमधून होत आहे.
--
माढा तालुक्यासाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करता येत नाही. वरिष्ठांच्या परवानगीनंतर त्यावर ताबडतोब कार्यवाही करून कामे मार्गी लावली जातील.
- एस.जे. नाईकवाडी, उपअभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती, कुर्डूवाडी
.............