दुधनीत १३२ जणांची कोरोना चाचणी; सर्व व्यापाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:14+5:302021-04-06T04:21:14+5:30
दुधनी मोठं व्यापारी शहर आहे. आडत व्यापारासह किराणा खरेदीसाठी अनेक शहरातील नागरिक दुधनीत येतात. यामुळे दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश ...
दुधनी मोठं व्यापारी शहर आहे. आडत व्यापारासह किराणा खरेदीसाठी अनेक शहरातील नागरिक दुधनीत येतात. यामुळे दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दुकानदार आणि कामगारांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन केले होते. यामुळे रविवारी सकाळी अकरा वाजता मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेत व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी मोठी गर्दी केली.
पहिल्या दिवशी दुपारी अडीचपर्यंत १३२ व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले. व्यापाऱ्यांनी आपला अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावावा, तो अहवाल नगर परिषद मार्फत तपासला जाणार आहे अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मंजुनाथ पाटील, रजनी बिराजदार, जय नाटकर, सुमन खंदारे, सुनील कोटनूर, कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी, कर्मचारी चन्नमल्लप्पा पाटील, रामचंद्र अत्ते, शांतलिंग चिंचोळी आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.
----०५चपळगाव-दुधनी कोरोना टेस्ट