सोलापूरच्या ‘वाडिया’मध्ये कोरोनाचे उपचार नको; नागरिक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:43 AM2020-03-12T11:43:47+5:302020-03-12T11:47:01+5:30
वाडिया हॉस्पीटलमध्ये यंत्रणा उभारण्याचा घेतला निर्णय; नागरिकांनी केला प्रशासनाच्या निर्णयाला विरोध
सोलापूर : कोरोना विषाणू बाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाडिया हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध केला आहे.
ट्रस्टमधील वादामुळे वाडिया हॉस्पिटल अनेक दिवसांपासून बंद आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने हे हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कर्मचाºयांनी बुधवारी सकाळपासून वाडिया हॉस्पिटलची साफसफाई सुरू केली. सायंकाळी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, सौरभ तुळसे, अतुल कांबळे, सिद्धार्थ शेंडगे यांच्यासह महिला या ठिकाणी पोहोचल्या. हे काम तत्काळ बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.
गौरव खरात म्हणाले, कोरोना विषाणूबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय करणारे रुग्णालय लोकवस्तीपासून बाहेर करायला हवे. लोकवस्तीमध्ये रुग्णालय केल्यास लोक भयभीत होऊ शकतात. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना गुरुवारी निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पण या ठिकाणी संशयित रुग्णांच्या नातेवाईकांना देखरेखेखाली ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
पुण्यात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यावर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने संशयित रुग्ण आढळलाच तर उपचारासाठी तातडीने सोय व्हावी, यासाठी वाडियाची इमारत ताब्यात घेतली आहे. या इमारतीत महापालिकेतर्फे उपचाराची यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
पुण्यात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने सतर्कता घोषित केली आहे. सोलापूरशेजारीच पुणे जिल्हा असल्याने आणि रेल्वेने पुणे, मुंबईला शेकडो प्रवाशांची ये-जा असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बुधवारी दुपारी शहरातील प्रमुख डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त दीपक तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर वाघमारे, अश्विनी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. सत्येश्वर पाटील, राज्य राखीव पोलीस बल गटाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, रेल्वेचे डॉ. ए. के. संजीव, शासकीय रुग्णालयातील मेडीसीन विभागाचे डॉ. विठ्ठल घडके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहर व जिल्ह्यातील कोणत्याही क्लिनिकमध्ये संशयित रुग्ण आढळल्यास डॉक्टरांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती कळवावी. अशा रुग्णावर तातडीने उपचार करण्यासाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याचे ठरले. त्यासाठी ही इमारत ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले. संशयित रुग्णांबाबत व्यवस्था काय असावी, याबाबत डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे स्वतंत्र तयार करण्यात येणाºया रुग्णालयात यंत्रणा उभी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला डॉ. सुदीप सारडा, डॉ. माधव गुंडेटी, डॉ. संतोष हराळकर, डॉ. सुधांशू कोठडिया, डॉ. पुप्पा अग्रवाल, डॉ. रोजन बेंबरे, डॉ. रामेश्वर डावकर, डॉ. सुरेश कंदले उपस्थित होते.