कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर; सोलापुरात १८ ठिकाणी होणार लसीकरण बुथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 02:46 PM2021-01-12T14:46:49+5:302021-01-12T14:48:22+5:30
३८ हजार कर्मचारी: दिवसाला होणार १८०० लसीकरण
सोलापूर : आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नोंद झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात १८ लसीकरण बुथ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी लोकमत शी बोलताना दिली.
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता राज्य सरकारही निर्णय घेणार आहे. या धर्तीवर जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरणाची रंगीत तालीम घेतली. ही चाचणी यशस्वी झाली व ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. लसीकरणासाठी जिल्ह्यातील ३८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील १८ हजार कर्मचारी ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील आहेत तर उर्वरित २० हजार कर्मचारी सोलापूर महापालिका क्षेत्रातील आहेत.
या पोर्टलवर झालेल्या नोंदीप्रमाणे ग्रामीण भागात १८ बुथ निश्चित करण्यात आले आहेत. या बुथवर लसीकरण करण्यासाठी प्रशिक्षण दिलेले पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित आरोग्य केंद्राचा ताफा तेथे व्यवस्थेसाठी असणार आहे. लसीचे साईड इफेक्ट आल्यास प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे १८ आॅक्सिजन व डॉक्टरांची सुविधा असलेल्या अॅम्बुलन्स सज्ज असणार आहेत. याचबरोबर लसीकरण बुथजवळील आठ आयसीओ सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
दररोज १८०० जणांना लस
ग्रामीण भागात दररोज १४०० जणांना लस दिली जाईल. लसीकरण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोर्टलवरील यादीप्रमाणे संबंधितांना लस कोणत्या दिवशी व किती वाजता दिली जाईल, याचा संदेश आदल्यादिवशी पाठवला जाणार आहे.
याठिकाणी होणार लसीकरण
अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, मंद्रुप, सांगोला ग्रामीण रुग्णालय, अकलुज, करमाळा, माळशिरस, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, अश्विनी कुंभारी, जेऊर (करमाळा), कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मजरेवाडी, सोरेगाव, भावनाऋझी, देगाव नागरी आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.