सोलापुरात पाच दिवस पुरेल एवढीच कोरोना लस; १०२ केंद्रांवर दररोज ६ हजार जणांना होतेय लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 PM2021-03-18T16:32:37+5:302021-03-18T16:32:45+5:30
आरोग्य विभागाने केली २ लाख डोसची मागणी
सोलापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ज्येष्ठ व जोखमीचे आजार असलेल्या लोकांचा प्रतिसाद वाढला असून, आता केवळ ४१ हजार डोस शिल्लक आहेत. नव्याने २ लाख डोसची मागणी केली असल्याची माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्पा फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आला. १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील जोखमीचे १९ आजार असलेले रुग्णांचा समावेश करण्यात आला. या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात १०२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे दररोज लसीकरणाचे सत्र वाढले असून, ६ हजार लोकांना डोस दिला जात आहे. सध्या आरोग्य विभागाकडे ४१ हजार १२० डोस शिल्लक असून, हा साठा पाच दिवस पुरणार आहे. त्यामुळे आणखी २ लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. यात १ लाख ९९ हजार कोविशिल्ड व १ हजार कोव्हॅक्सिनची लस देण्यात यावी, असे नमूद केले आहे.
जिल्ह्यातील साडेचार लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ८९ हजार लोकांना लस दिली आहे. सध्या लसीकरणाचा वेग वाढला असून, उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकदम दोन लाख डोस मागितले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ३४ हजार व सिव्हिल हॉस्पिटलसाठी २ हजार डोस आले होते. त्यानंतर दोन वेळा डोस आले. असे एकूण १ लाख ४४ हजार डोस आले आहेत. आता ग्रामीण आरोग्य विभागाकडे ३० हजार २४० व महापालिका आरोग्य विभागाकडे १० हजार ८८० डोस शिल्लक आहेत. सिव्हिल हॉस्पिटलकडे आलेले डोस कोव्हॅक्सिनचे असून, आणखी ६०० डोस शिल्लक आहेत. काही जण ही लस मागत असल्याने केवळ १ हजार डोस मागण्यात आले आहेत.
२४ खाजगी रुग्णालयात सोय
सध्या जिल्ह्यात १०२ रुग्णालयांतून काेरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यामध्ये शहरात महापालिकेचे १० आरोग्य केंद्रे, १२ खाजगी रुग्णालये, तर ग्रामीणमध्ये ६८ सरकारी आरोग्य केंद्रे व १२ खाजगी रुग्णालयांत लस दिली जात आहे. लसीबाबत जनजागृती वाढल्याने लोक स्वत:हून येत आहेत. त्यामुळे दरराेज लसीकरणाचा वेग वाढला आहे. खाजगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.