कोरोनाबाधितांनी ओलांडला हजाराचा आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:21+5:302021-04-17T04:21:21+5:30
राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागल्याने, शासनाने १५ एप्रिलपासून ...
राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागल्याने, शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदीचा नियम जारी केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. असे असले, तरी रस्त्यावरून नागरिक मात्र कशाचीही तमा न बाळगता फिरताना दिसत आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांत झपाट्याने वाढत असल्याने कडक संचारबंदी जाहीर केली आहे. या काळात सॅनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टन्स ठेवण्याचा कडक नियम केला आहे. असे असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या प्रचारसभांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
...तर रुग्णांना बेड मिळणे अशक्य
शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचे नागरिकांनी काटेकोर पालन केले पाहिजे, जेणेकरून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स ठेऊन गर्दीत जाणे टाळावे. सतत मास्कचा वापर करावा. सॅनिटायझरचा वापर करून स्वतः व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले नाही, तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत राहिल्यास रुग्णांना बेड मिळणे अशक्य होणार असल्याची खंत उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोविड रुग्णालये फुल्ल
पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या १,१०५ वर गेली आहे. पंढरपूरमध्ये खासगी व शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून कोविड रुग्णांना ३५० बेडची व्यवस्था आहे. मात्र, संपूर्ण बेड फुल्ल झाल्याने नवीन रुग्णांना बेड उपलब्ध करण्याची शासनाला तजवीज करावी लागणार आहे, शिवाय ७०० रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, तर ५० ते ६० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
कोट ::::::::::::::::
पोलीस प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी नाकेबंदी, विनामस्क कारवाया सुरू आहेत, शिवाय शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल.
- विक्रम कदम
उपविभागीय पोलीस अधिकारी