सोलापुरात ‘कोरोना’ व्हायरसची पोस्ट झाली व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:28 AM2020-03-06T10:28:52+5:302020-03-06T10:31:53+5:30
सोशल मिडियावरील अफवांमुळे सोलापूर शहरात भीतीचे वातावरण; जिल्हाधिकारी म्हणाले काळजीचे नाही कारण
सोलापूर : शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा रुग्ण आढळल्याची पोस्ट गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. खासगी रुग्णालयातील लॅबने संशयित रुग्णाबाबत केलेल्या निदानाचा अहवाल फिरू लागल्यावर मात्र प्रशासनाचेही टेन्शन वाढले. शेवटी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत खुलासा केल्यावर लोकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.
झाले असे दुपारी दीड वाजेच्या सुमाराला सोशल मीडियावर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मायक्रोबायोलॉजीचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला. संदीप मोकाशी (वय ३६) या रुग्णाबाबत डॉ. अनुपम शहा यांनी दिलेल्या संदर्भावरून ही चाचणी करण्यात आलेली होती. अहवालात अॅटीपीकल बॅक्टेरियामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया आणि व्हायरसेसमध्ये कोरोना व्हायरस डिटेक्टेड असे नमूद केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा अहवाल सोशल मीडियावर फिरू लागल्यावर जागरुक नागरिकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून हे खरे आहे काय अशी विचारणा सुरू केली. त्यावर ‘लोकमत’ने संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून वस्तुस्थितीदर्शक फेसबुकवर आॅनलाईन बातमी प्रसिद्ध केल्यावर याची शहरभर चर्चा सुरू झाली.
शहरात अफवांचे पीक
- सोशल मीडियावर संबंधित रुग्णाचा अहवाल व्हायरल झाल्यावर शहरात वेगवेगळी अफवा पसरली. सोलापुरात कोरोना रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले. आढळलेला रुग्ण नाशिकचा असून, त्याला तातडीने पुण्याला हलविले आहे अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. सुरुवातीला याबाबत नेमकी माहिती न मिळाल्याने हा विषय चर्चेचा बनला. विशेष म्हणजे अहवालावर असलेल्या नावाच्या व्यक्तीला सोलापूर प्रांत कार्यालयातील कर्मचारी ओळखत होते. मोकाशी हे आर्किटेक्चर असून, घरकूल बांधणीच्या कामाच्या फायली घेऊन महसूलच्या कार्यालयात येत होते. त्यामुळे या कर्मचाºयांनी एकमेकांना संपर्क साधून विचारणा सुरू केली. तसेच त्यामुळे जिज्ञासू व जागरूक नागरिकांनी खातरजमा करण्यासाठी ‘लोकमत’च्या कार्यालयाशी संपर्क साधला. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी त्या अहवालाची खातरजमा करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व ‘लोकमत’ फेसबुक पेजवर वस्तुस्थिती मांडल्यावर लोकांच्या मनातील भीती निवळत गेली.
नातेवाईकांनी पुण्याला हलविले
- प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी सकाळी मोकाशी यांच्या नातेवाईकांनी रुग्णास पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण परदेशी गेलेला नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी तिरुपतीला गेल्याचे सांगण्यात आले. पण ४ मार्चच्या आधी तीन दिवसांपासून त्रास असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतक्या दिवसांनी इन्फेक्शन होण्याची शक्यता नसल्याचे डॉ. तापडिया यांनी सांगितले. रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याने काळजीचे कारण नाही असे त्यांच्या पत्नी व नातेवाईकांना सांगण्यात आले होते. तरीही त्यांनी आज सकाळी रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला.