कोरोना रुग्णाकडून घेतलेल्या बिलाची तपासणी करणार : तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:22 AM2021-05-11T04:22:56+5:302021-05-11T04:22:56+5:30
करमाळा तहसील कार्यालयाकडे शहरातील रुग्णालये व मेडिकलमधून रुग्णांची आर्थिक लूट होते. याबाबत अनेक संघटना व रुग्णांनी ...
करमाळा तहसील कार्यालयाकडे शहरातील रुग्णालये व मेडिकलमधून रुग्णांची आर्थिक लूट होते. याबाबत अनेक संघटना व रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी बिल तपासणी समितीचे अध्यक्ष दिलीप तिजोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल डुकरे, नायब तहसीलदार जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, विशाल घोलप, प्रा.अशोक नरसाळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, फिसरे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे उपस्थित होते. तहसीलदार माने म्हणाले, कोरोनाच्या काळात माणुसकीचा धर्म स्वीकारून डॉक्टरांनी नियमाप्रमाणे बिले घेतली पाहिजेत. रुग्णांना अधिकृत बिले दिली पाहिजेत. पैसे घेतल्यानंतर पैसे मिळाल्याची पोच पावती दिली पाहिजे, मेडिकल दुकानदारांनीही संगणकाद्वारे लॉट नंबर, बॅच नंबर, एक्सपायरी डेट या सर्व गोष्टी नमूद करून बिल दिले पाहिजे. यामध्ये कोणी कसूर केले, तर शासन स्तरावर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.
या बैठकीत हनुमंत रोकडे यांनी एका खासगी कोरोना हॉस्पिटलमधून जास्त बिल वसूल केल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर चौकशी समितीचे अध्यक्ष दिलीप तिजोरे यांनी संबंधित डॉक्टरांकडून खुलासा मागवून चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले. तहसीलदार माने म्हणाले, ज्या रुग्णांकडून लेखी तक्रारी येतील आणि त्यात तथ्य असेल, अधिकृत बिल दिले नसतील, अशा रुग्णांना जास्तीचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महेश चिवटे यांनी प्रत्येक बिल शासनाच्या बिल तपासणी समितीच्या अध्यक्षाची सही झाल्यानंतरच डॉक्टरांना बिल देण्याचा नियम करावा, अशी मागणी केली.