रुग्ण उपचारासाठी उशिरा येत असल्याने सोलापुरातील कोरोनाचा मृत्यूदर जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:25 PM2020-06-11T12:25:12+5:302020-06-11T12:27:23+5:30
शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचे स्पष्टीकरण; मृत रुग्णांचे वयही अधिक
सोलापूर : कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उशिरा येत आहेत. बहुतांश रुग्णांचे वय अधिक असल्याने त्यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नाही, म्हणूनच मृत्यूदर अधिक आहे़ कोरोनाबाधित रुग्ण वेळेवर आले तर ते लवकर बरे होऊ शकत असल्याचे मत शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ संजीव ठाकूर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. ठाकूर म्हणाले, उपचारासाठी येणारे रुग्ण उशिराने येतात. त्यातच त्यांची प्रकृती उपचारास साथ देत नाही. त्यांच्यावर उपचार करणे अशक्य होते. ५० हून अधिक वयाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत २० ते ३० वयोगटातील केवळ एकाच रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना आजाराची लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी तातडीने तपासणीसाठी यावे. ते जितक्या लवकर येतील तितक्या लवकर ते बरे होऊ शकतात. आमचे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे सर्व रुग्णांची योग्य सेवा करत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार होतात. आपल्याकडे बेडची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये आयसोलेशन वॉर्ड सुरू करणारे सिव्हिल हॉस्पिटल हे राज्यातील पहिले हॉस्पिटल आहे. ए ब्लॉकमध्ये आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णामध्ये योग्य अंतर ठेवण्याची काळजी घेण्यात आली आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर, आॅक्सिजन आदींची सोय आहे. आयसोलेशन वॉर्ड सुरू केल्यापासून आजपर्यंत आपण एकदाही उपचार बंद केले नाहीत. कोरोनाबाधित २४ गर्भवती मातांची येथे प्रसूती करण्यात आली. आम्ही सर्वगुणसंपन्न नाही. आमच्या चुका निदर्शनास आणल्यास त्या दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या ए ब्लॉकची (आयसोलेशन वॉर्ड) इमारत जुनी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दुरुस्ती करण्यात आली आहे. रुग्णांना सकस आहार दिला जातो. सकाळी चहा, नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा-बिस्कीट तर रात्री जेवण दिले जाते. यात अंडी, अद्रक व तुळशीचा काढा, चपाती, भाजी, वरण, चिक्की आदींचा समावेश असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.
फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्यास कोरोना वाढणार
- शासनाने सांगितलेले नियम आपण सर्वांनी पाळायला हवेत. व्यायाम आणि इतर काही सवलती शासनाने दिल्या असल्या तरी नियमाच्या अधिन राहून आपला दैनंदिन व्यवहार करावा. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. हात वारंवार धुवावेत. हे नियम जर पाळले नाही तर रुग्णसंख्या वाढेल, अशी शक्यता अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केली.