कोरोनाचे सावट; सोलापुरातील ४५ न्यायाधीन कैद्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:53 AM2020-05-14T11:53:07+5:302020-05-14T11:56:40+5:30
आठ कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडणार; जे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार
सोलापूर : जगभर कोरोनाने थैमान घातल्यामुळे शिक्षा झालेल्या कारागृहातील कैद्यांनाही पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा कारागृहातील ४५ न्यायाधीन कैद्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यातील कारागृहात असलेल्या न्यायाधीन कैद्यांना ४५ दिवसांच्या रजेवर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृहातील न्यायाधीन कैद्यांना सोडण्यात आले आहे. कोविड-१९ ची परिस्थिती अशीच राहिली तर त्यात पुन्हा ३0 दिवसांनी वाढ देण्यात येणार आहे. कारागृहात असलेले न्यायाधीन कैदी ज्यांना ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते अशांना ४५ दिवसांच्या पॅरोल रजेवर सोडण्यात आले आहे. राज्यातील कारागृहातील शिक्षा झालेल्या आरोपींना सोडण्यात येत आहे.
ज्या आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली आहे व ज्यांना एक वेळा पॅरोलवर सोडले होते, मात्र ते वेळेवर कारागृहात हजर झाले आहेत. अशा कैद्यांना पॅरोलवर सोडले जाणार आहे. सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या आरोपींना यापूर्वी दोन वेळा पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र जे वेळेवर कारागृहात हजर झाले होते अशांना पुन्हा पॅरोलवर सोडले जाणार आहे.
आरोपींना सोडण्याचे आदेश झालेली कारागृहे...
- येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह मुंबई, तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक, भायखळा मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह ठाणे, कल्याण जिल्हा कारागृह या आठ कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडले जात आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डी. एस. इगवे यांनी दिली.