कोरोनाचा फटका; अडत्यालाच ९०० रुपये देऊन त्या शेतकºयाने गाठले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:06 PM2020-06-10T12:06:31+5:302020-06-10T12:08:00+5:30
उपळेच्या कलिंगड उत्पादकाची व्यथा; शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत
वैराग: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रात बसू लागला आहे. बळीराजाही यातून सुटलेला नाही. बार्शी तालुक्यातील एका शेतकºयाचे कलिंगड कवडीमोल भावानं विकलं गेलं. त्यांनी सोलापूरच्याबाजारपेठेत ११३ कॅरेट कलिंगड विकून २९२० रुपये पट्टी आली. त्यात हमाल-तोलाई, वाहतूक खर्च वगळता या शेतकºयाला पदरचेच ९०० रुपये द्यायची वेळ आली.
कोरोना काळात शेतकºयांचा माल कवडीमोल भावाने विक्री होत आहे. उपळे दुमाला येथील शेतकºयाला १३० कॅरेट कलिंगडाची विक्री करून त्याच्या हातात काही रक्कम आली नाहीच, परंतु उलट अडत्यालाच ९०० रुपये पदरचे द्यावे लागले अन् शेतकºयाला मात्र रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
उपळे दुमालाचे शेतकरी विकास पासले यांनी एक एकर कलिंगड पिकाची लागवड केली होती. यामध्ये अकरा टन माल निघाला. यासाठी पीक लागवडीपासून काढणीपर्यंत ५० हजार रुपये खर्च झाला. यातील आठ टन माल पुणे बाजारपेठेत एका कॅरेटला साडेचार रुपये दराने विक्री केला. त्याचे वाहतूक व अडत खर्च वजा जाता २८ हजार रुपये पदरात पडले.
त्यानंतर सोलापूर अडत बाजारात तीन टन माल मंगळवार, ९ जून रोजी पाठवला होता. यामध्ये एका कॅरेटला एक रुपयापेक्षा कमी भाव मिळाल्याने ११३ कॅरेटचे विक्रीतून २९२० रुपये आले. मात्र याचे वाहन भाडे २५०० रुपये, अडत-हमाली ८८० रुपये, २२० रुपये तोलाई, २२० रुपये कॅरेट भाडे असा एकूण ३८२० रुपये अडत खर्च झाला. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता शेतकºयाला पदरचे ९०० रुपये अडत्याला देऊन रिकाम्या हाताने गावी परतावे लागले.
म्हणजे त्या शेतकºयाला एक एकरात पन्नास हजार रुपये खर्च करून फक्त २८ हजार रुपये पदरात पडले, तर बावीस हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला.