कोरोनाचा फटका; सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्न ४० कोटींनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:06 PM2020-08-12T12:06:19+5:302020-08-12T12:10:38+5:30
महसूली उत्पन्नात झाली मोठी घट; उपाययोजनांवरील खर्चही वाढतोय
राकेश कदम
सोलापूर : कोरोना विषाणूचा फटका महापालिकेच्या तिजोरीलाही बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या चार महिन्यांत पालिकेच्या महसुली उत्पन्नात ४० कोटी रुपयांची घट दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोना उपाययोजनांवरील खर्चही वाढत आहे.
एप्रिल २०१९ मध्ये विविध १७ विभागांमधून ३ कोटी ७७ लाख ३९ हजार ४६ रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या एप्रिल महिन्यात केवळ चार लाख १६ हजार १८५ रुपये उत्पन्न मिळाले. मे महिन्यात मुद्रांक शुल्क अनुदानातून १ कोटी ९७ लाख रुपये मिळाले. शहर आणि हद्दवाढ भागातील नागरिकांना कर आकारणी बिले मिळाली नसतानाही त्यांनी २ कोटी ९ लाख रुपयांचा करभरणा केला. त्यामुळे मनपाच्या तिजोरीला काहीसा दिलासा मिळाला.
मागील वर्षी जुलै अखेर मनपाला महसुली उत्पन्नातून ५० कोटी ९२ लाख ७ हजार ९० रुपये मिळाले होते. यंदा १० कोटी २८ लाख ९३ हजार ६४१ रुपये मिळाले आहेत. भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान आदी विभागांकडून गेल्या चार महिन्यांत काहीच उत्पन्न मिळाले नाही. जीएसटी अनुदानापोटी दरमहा १९ कोटी १३ लाख रुपये मिळत आहेत. त्यावरच पालिकेचा गाडा तग धरून आहे.
महिना वर्ष २०१९ वर्ष २०२०
- एप्रिल ३ कोटी ७७ लाख ३९ हजार ४६ ४ लाख १६ हजार १८५
- मे ५ कोटी ८९ लाख १५ हजार ५९५ ५ कोटी ८ लाख ७८ हजार १९७
- जून ११ कोटी ५ लाख ८६ हजार १०३ १ कोटी ३८ लाख ७५ हजार ४९
- जुलै ३० कोटी १९ लाख ६६ हजार ३४६ ३ कोटी ७७ लाख २४ हजार २१०
अंदाजपत्रकाचा पत्ता नाही, म्हणे भांडवली निधी द्या
प्रशासनाने यावर्षी ७०४ कोटी २१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाला सादर केले. महापालिकेचे अंदाजपत्रक मार्चऐवजी जूननंतर मंजूर करण्याची वाईट प्रथा गेल्या तीन वर्षात रुढ झाली आहे. यंदा १५ आॅगस्ट उजाडण्याची वेळ आली तरी साधी मनपाची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन झाले नाही.
यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात १५० कोटी रुपयांची वाढ दाखवून सभागृहात सादर करण्याचे नियोजन झाले होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वकाही बिघडले. आता प्रथम सर्वसाधारण सभा घेऊ. त्यानंतर सर्व पदाधिकाºयांशी चर्चा करून अंदाजपत्रक वेळेत सादर करण्याची तयारी करू.
- श्रीनिवास करली, सभागृह नेता, मनपा.