कुंभार समाज आर्थिक विवंचनेत; गरिबाचा फ्रीज पडला कोनाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:54 PM2020-04-27T14:54:55+5:302020-04-27T14:56:49+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन; आम्ही भूक कशी भागवायची...सवाल
अक्षय आखाडे
कोर्टी : जसजसे ऊन वाढत जाते तसतसे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ग्राहकांअभावी हातावरचं संसार असलेल्या कुंभार समाजापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सणासुदीच्या काळात मातीची भांडी करून त्याच्या विक्रीतून पोट भरणाºया कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय डबघाईला आला आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाया सणाला हिंदू धर्मात मातीच्या भांड्यात आंबा ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दरवर्षी नव्या केळीचा उपयोग पूजेसाठी केला जातो. त्यासाठी कुंभार समाज मोठ्या प्रमाणात मातीची भांडी निर्माण करतो. त्यातून कुंभार कारागिराला बºयापैकी पैसे मिळतात़ यंदा तयार केलेले माठ अद्याप मागणी नसल्याने पडून आहेत़ ऐन पैसे कमावण्याच्या काळात त्याची विक्री झाली नाही़ पुढे उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न अनेक कारागिरांना पडला आहे.
उपासमारीची आली वेळ
- करमाळा शहर, राजुरी, कुंभारगाव, पारेवाडी, खडकी, जिंती आदी गावांमध्ये माठ बनवण्याचा व्यवसाय चालतो. अनेक कुटुंबाची गुजराण या व्यवसायावर आहे़ मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन राहिले आणि साहित्य बाजारात विक्रीसाठी नेता आले नाही़ जत्रा आणि आठवडे बाजारात माठाची विक्री होत असते, परंतु बाजार आणि दुकानेही बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे़ यंदा एक हजार मठाची निर्मिती केली आहे़ परंतु आतापर्यंत शंभर माठ देखील विक्री झालेले नाहीत. यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा राजुरीच्या बिभीषण वाघमारे, नवनाथ वाघमारे या व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.