अंगावर आजार काढण्यामुळे सोलापुरात आॅक्टोबरमध्ये वाढले कोरोनाचे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 01:22 PM2020-10-31T13:22:49+5:302020-10-31T13:23:04+5:30
सोलापुरातील परिस्थिती; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
सोलापूर : कोरोनाची लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्या या आवाहनाला अनेक सोलापूरकर प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. आॅक्टोबर महिन्यातील अनेक मृत्यू हे २४ तासांच्या आत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यालयामार्फत शुक्रवारी अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये उमा नगरी, आरटीओ परिसर, विजापूर रोड येथील दोन रुग्णांच्या मृत्यूचा संदर्भ देण्यात आले आहेत. अशक्तपणा, वास न येणे, चव न जाणवणे, सर्दी ही वरवर पाहता क्षुल्लक शारीरिक लक्षणे या दोन रुग्णांमध्ये होती. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे या रुग्णांच्या जीवावर बेतले आहे.
या रुग्णांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही त्यांच्या खासगी डॉक्टरांनी दिला होता. तरीही हे रुग्ण घरी बसून राहिले आणि अचानक मृत्युमुखी पडले. शहरातील काही भागात नागरिक आपल्या घरी येणा?्या तपासणी पथकांना विरोध करतात. लक्षणे असून देखील स्वॅब टेस्ट देण्यास नकार देतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसगार्चा धोका वाढत आहे. लवकर निदान व उपचार केल्यास कोरोनावर मात करता येते. यापुढील काळात तरी नागरिकांनी उपचारास टाळाटाळ करु नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी काळजी घ्यावी...
आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाले आहेत. ही गंभीर बाब आहे. दिवस सणासुदीचे आहेत. लोक आता पुन्हा एकत्र येणार आहेत. या काळात आपण सर्वांनी एकमेकांची काळजी म्हणून फिजिकल डिस्टन्स पाळणे, अंगावर आजार न काढता तत्काळ रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.