कोरोनाच्या तिसऱ्या लाटेल लहान मुलांना होणार त्रास; सोलापुरातील आरोग्य यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:53 PM2021-05-17T13:53:13+5:302021-05-17T13:53:22+5:30
लाट रोखण्याची तयारी : मनपा उपायुक्तांनी घेतली बालरोग तज्ज्ञांसोबत बैठक
सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका १५ नागरी आरोग्य केंद्रावर लवकरच आरोग्य तपासणी सुरू होणार आहे. शिवाय लहान मुलांसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये ५० तर डफरीन हॉस्पिटलमध्ये २० बेड उपलब्ध होतील, असे मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.
मनपा उपायुक्तांनी शहरातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. यावेळी बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. वैशाली शिरशेट्टी, सचिव डॉ. सरिता आरकाल, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. नकाते, डॉ. हेमंत साठे, डॉ. किरण पाटील, डॉ. समीर खान, डॉ. विक्रम हिरेकेदर, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. चाफळकर आदी उपस्थित होते. पांडे म्हणाले, कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये लहान मुलांना जास्त त्रास जाणवला नाही. परंतु, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्र आणि डफरीन हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असतील. पालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षणही देण्यात येेत आहे. याशिवाय खासगी डॉक्टरांची यादीही जाहीर करण्यात येईल. डफरीन हॉस्पिटलमध्ये २० तर वाडिया हॉस्पिटलमध्येे ५० बेडची सोय करण्यात येईल. लहान मुलांसाठी आवश्यक असलेली औषधे, व्हेंटीलेटर्सचे मास्क व इतर आवश्यक साहित्यही खरेदी करण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. पालिकाही अत्यावश्यक साहित्य घेणार आहे. खासगी डॉक्टरांना आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या नोंदी ठेवून पालिकेला कळविण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीनंतर मनपा अधिकारी आणि डॉक्टरांनी वाडिया हॉस्पिटलची पाहणी केली.
आपल्या लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, जुलाब, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागली तर पालकांनी तत्काळ त्यांची तपासणी करून घ्यावी. पालकांनी घाबरून जायचे कारण नाही. वेळेवर उपचार केल्यास कोरोनावर सहज मात करता येते. दोनच दिवसांत पालिकेची केंद्रे आणि खासगी डॉक्टरांची यादी जाहीर होईल.
- धनराज पांडेे, उपायुक्त, मनपा.
आजवर तीन मुलांचा मृत्यूू
शहरात पहिल्या लाटेेत एक तर दुुसऱ्या लाटेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या मुुलांमध्ये दिसलेली लक्षणे, मृत्यूचे कारण याची माहिती डॉक्टरांना आणि नागरिकांना दिली जाईल. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला काही माहिती आवश्यक आहे, असेही पांंडे यांंनी सांगितले.