योग्य उपचार मिळत नसल्याने कोरोनाबाधित सरकारी डॉक्टरचा ‘सिव्हिल’ला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:05 AM2020-05-19T11:05:04+5:302020-05-19T11:08:14+5:30
आयसोलेशनमधून व्हिडिओ पाठविताच उपमुख्यमंत्री कार्यालयाचीही यंत्रणा हलली
सोलापूर : कोरोनाग्रस्त डॉक्टर परिवारातील सदस्यांना योग्य उपचार न मिळाल्याने डॉक्टरच्या वडिलांचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आता कोरोनाग्रस्त आईची प्रकृतीही गंभीर असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्याची नितांत गरज असल्याची भावना सोलापुरातील एका पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केली. त्यांचा वेदनादायी व्हिडिओ पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासह राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मदतीकरिता धाव घेतली. अखेर सीरियस असलेल्या डॉक्टरच्या आईला पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत एका पोटविकार तज्ज्ञांच्या परिवारातील सहा सदस्य कोरोनाग्रस्त आढळले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या व्यथा खुद्द त्या डॉक्टरांनी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर मांडल्या.
शासकीय रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याची तक्रार त्यांनी केली, यातूनच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता आईदेखील सीरियस असल्याची व्यथा त्यांनी मांडली. आईला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत तसे न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. भविष्यात कोणतेही डॉक्टर आरोग्यसेवा देण्यास धजावणार नाहीत, अशी खंतदेखील त्यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केली.
अजित पवार यांच्याकडून झाली मदत
- आपत्कालीन व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सुजित अडसूळ सांगतात, त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी खूप भावुक झालो आणि चिंताग्रस्तही. त्यानंतर सोलापुरातील त्या डॉक्टरांशी संवाद साधला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय सहायक सुनील मुसळे यांच्याशी आणि आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे सर यांच्याशी बोललो. तसेच संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. अखेर पुण्याच्या एका खाजगी हॉस्पिटलकडून उपचार करण्याची तयारी दर्शवणारे पत्र मिळाले. त्यानंतर कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईला दाखल करण्यात आले आहे.
सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले
- मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी पुण्यातील त्यांच्या डॉक्टर मित्रांशी संवाद साधून कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईच्या उपचाराकरिता पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करता येईल का, याकरिता त्यांची धडपड सुरू झाली. याकरिता बारामती येथील भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ यांची देखील मदत झाली. सध्या त्या कोरोनाग्रस्त डॉक्टर व त्यांच्या आईवर पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच डॉक्टरांचे बंधू, वहिनी आणि पत्नी यांच्यावर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.