Solapur: मोठी बातमी; कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले; सोलापुरात १५ वर्षाचा मुलगाही कोरोनाबाधित
By Appasaheb.patil | Published: March 11, 2023 05:23 PM2023-03-11T17:23:34+5:302023-03-11T17:24:18+5:30
Solapur: गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. सध्या कोरोनाचे १९ बाधित रूग्ण सोलापुरात आहेत. या रुग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी एकूण १४८ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात २ लोक पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टव्दारे तपासणी करण्यात येत आहे. वयोगटानुसार ० ते १५ वयोगटातील १ तर ५१ ते ६० पेक्षा अधिक वय असलेला एकजण शनिवारी कोरोनाबाधित झाला. यात एक स्त्री व एक पुरूष रूग्ण आहे. घरात विलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या १९ आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
शहरातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
- आजपर्यंतचे पॉझिटिव्ह बाधित रुग्ण - ३४ हजार ५६१,
- आजपर्यंत मृतांची संख्या - १ हजार ५१६,
- शहरातील बाधित असलेले रुग्ण - १९
- रुग्णालयातून बरे होऊन गेलेले रुग्ण - ३३ हजार २६