माढ्यात २,८८५ वृद्धांना कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:44+5:302021-03-28T04:21:44+5:30
कुर्डूवाडी : तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ८६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांची खूप मोठी काळजी घेतली ...
कुर्डूवाडी : तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ८६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांची खूप मोठी काळजी घेतली जात आहे. माढा तालुक्यात ६० वर्षांवरील २ हजार ८८५ इतक्या वृद्धांना लस देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पंचायत समितीअंतर्गत सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या मदतीने तालुक्यात हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क वापरणे या त्रिसूत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा, अंगणवाडी, आरोग्य वर्धिनी केंद्र, उपकेंद्र यांच्या मदतीनेही सार्वजनिक ठिकाणी गाव भेट दौरा, पदयात्रा व गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यादरम्यान आतापर्यंत ७८ व्यक्तींकडून १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांनी माढा पंचायत समितीतील आढावा बैठकीत बोलताना दिली.
कोरोनामुक्त गाव या अभियानअंतर्गत माढ्यातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी गावभेट दौरा, दुकानदार व ग्रामस्थांमध्ये जनजागृती मोहीम, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोविड लसीकरण मोहिमेवर बैठकीत चर्चा झाली.
---
या आढावा बैठकीस गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ. ए. सी. मुजावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, गटशिक्षणधिकारी मारुती फडके, बांधकाम उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. एल. बागल, सयाजीराव बागल, पाणीपुरवठा अधिकारी गफूर शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सोमवंशी, विनोद लोंढे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार, दादासाहेब मराठे, बंडू शिंदे, भारत रेपाळ, पी. आर. लोंढे, महेश शेंडे, दयानंद वाघमारे, कानडे उपस्थित होते.
--
४,३९८ रुग्ण झाले बरे
या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांनी ४ हजार ३९८ इतके रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची माहिती दिली. माढा तालुक्यात १०८ ग्रामपंचायतींमध्ये ६३ हजार १२१ इतकी कुटुंबसंख्या आहे. ३ लाख १७ हजार ८२० इतकी लोकसंख्या आहे. सध्या तालुक्यात ८ आरोग्य वर्धिनी केंद्र व त्याअंतर्गत ४५ उपकेंद्रे आहेत. तालुक्यात ४ हजार ७१७ इतक्या व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. त्यामधील ४ हजार ३९८ इतके रुग्ण बरे झाले आहेत, तर यापैकी १३४ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या १८५ इतके रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
---
२७ कुर्डूवाडी हेल्थ
कुर्डूवाडी पंचायत समितीच्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेताना झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार.