तलवारीने तुकडे करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक कामाठीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:12 PM2022-04-11T17:12:58+5:302022-04-11T17:13:05+5:30
भगवान नगर जवळील प्रकार : जेलरोड पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
सोलापूर : तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुकडे तुकडे करीन आणि फेकून देईल, अशी धमकी देत एकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनील कामठीसह सात जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण ९ एप्रिल रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास झाली.
आकाश चव्हाण, नगरसेवक सुनील कामठी, गणेश कामठी, शिवा कामठी, आकाश कामठी, महेश पवार, मनोज बनसोडे (सर्व रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संजय काशिनाथ आडगळे (वय ३९ रा. भगवान नगर पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर) हे राम जाधव यांच्या वाढदिवसासाठी मुराजी पेठेतील सुर्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या कांचन गॅरेज मध्ये गेले होते. दरम्यान तिथे सर्व जण आले, शुभेच्छा दिल्या नंतर सर्वजण संजय आडगळे याच्याजवळ आले. त्यातील एकाने तू आमच्या पप्पाला सोडून दुसऱ्या पार्टीत गेलास आता तुला सोडत नाही. तुझा गेमच करतो असे म्हणत बाहेर चल असे म्हणाला. संजय आडगळे यांनी सर्वांची नजर चुकवून तेथून घरी निघाले. तेव्हा अनोळखी दोन मोबाईल नंबर वरून आडगळे यांना फोन आला. तू कुठे आहेस तुला आज सोडणार नाही अशी धमकी दिली.
संजय आडगळे यांनी मी घराकडे आलो आहे, तुम्ही कोण आहात मला फोन करू नका असे म्हणाले. भगवान नगर जवळ संजय आडगळे हे मित्र संदीप वाडेकर यांच्या सोबत बोलत थांबले होते, काही वेळाने ते जवळ असलेल्या रिक्षात बसले. तेव्हा सर्व जण आले व त्यांनी संज्या तू कुठे लपुन बसला आहेस? असे ओरडू लागले. दरम्यान आकाश चव्हाण याने संजय आडगळे यांना रिक्षात बसलेले पाहिले व बाहेर ओढून काढले. पडलेल्या विठाने मारहाण केली, सुनील कामाठी याने लाकडाने मारहाण केली. सुनील कामाठी याने हातात तलवार घेऊन आमच्या विरोधात गेलास तर तुकडे करीन, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद संजय आडगळे यांनी दिली आहे. तपास साहायक पोलीस निरीक्षक चिंताकेंदी हे करीत आहेत.
खुनीहल्ला केल्याचा गुन्हा; रिक्षाचेही केले नुकसान
0 नगरसेवक सुनील कामाटी याच्यासह सात जणांविरुद्ध भादवि कलम ३०७, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, ३४ मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणी दरम्यान उभी असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले. दरम्यान संदीप वाडेकर हा भांडणे सोडवत असताना त्याला सुनील कामाठी याने तु मध्ये पडू नको तुझा काही संबंध नाही असे म्हणाला असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.