सोलापूर विद्यापीठातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार!
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 17, 2023 05:41 PM2023-03-17T17:41:33+5:302023-03-17T17:42:01+5:30
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली विधानसभेत माहिती
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भ्रष्टाचार संदर्भात विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी पुन्हा विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू. त्यानंतर योग्य ती कारवाई होईल, अशी माहिती दिल्यानंतर राम सातपुते विधानसभेत शांत झाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. विद्यार्थ्यांच्या वतीने आमदार सातपुते यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. आता या प्रकरणाची उच्च अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्यामुळे कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.