बेंगलोरच्या महिला भक्ताने विठ्ठल-रुख्मिणीसाठी बनविला पोशाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:45+5:302021-02-10T04:22:45+5:30
पंढरपूर : वसंत पंचमी (१६ फेब्रुवारी) दिवशी विठ्ठलाचा रुक्मिणी मातेसोबत विवाह सोहळा मंदिराच्या सभामंडपात रंगणार आहे. या विवाह ...
पंढरपूर : वसंत पंचमी (१६ फेब्रुवारी) दिवशी विठ्ठलाचा रुक्मिणी मातेसोबत विवाह सोहळा मंदिराच्या सभामंडपात रंगणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी विठ्ठलाला नवरदेवाप्रमाणे, तर रुक्मिणीला नवरीप्रमाणे पांढराशुभ्र पोशाख बंगलोरच्या सविता चौधरी या महिला भक्ताने तयार केला आहे.
वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. विठ्ठल मंदिरातील सभामंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात येते. संपूर्ण सभामंडप फुलांनी सजविण्यात येतो. विठ्ठल-रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींमध्ये आंतरपाट धरण्यात येतो. वऱ्हाडींना अक्षता वाटून मंगलाष्टका होतात. शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्याची परंपरा आहे. सामान्य माणसांच्या विवाहप्रमाणे खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विठ्ठल भक्तांची मंदिरात अलोट गर्दी होते.
अशा विवाह सोहळ्यादरम्यान विठ्ठलाला घालण्यात येणारा पोशाख सविता चौधरी यांनी सिल्क कपड्यापासून तयार केला आहे. पोशाखाची डिझाइन करण्यासाठी त्यांना १५ दिवसांचा कालावधी लागला आहे. विठ्ठलसाठी धोती, अंगी, पागोटे, उपरणे आणि रुक्मिणीसाठी कांचीपुरम सिल्क साडी व चोळी तयार केली आहे. हा पोशाख त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आला. नक्षी पोषाखावर विठ्ठल विष्णूचा आवतार समजले जातात. यामुळे विष्णू देवाशी निगडित असलेली शंख, चक्र, ओम् यांची चित्रं कपड्यांवर कोरण्यात आली आहेत.
----
फोटो : ०९ विठ्ठल रुक्मिणी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी लागणारा पोषाख देताना सविता चौधरी व त्यांचे वडील एस.एम. चौधरी. (सचिन कांबळे)