अँटिजेन टेस्ट मोहिमेत नगरसेवकांचा पुढाकार; सोलापुरात तपासण्यांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:12 PM2020-07-27T12:12:48+5:302020-07-27T12:16:42+5:30
कोरोनाला अटकाव : सुरुवातीला घाबरले, आता लोकांना जमविण्यासाठी पळू लागले
सोलापूर : महापालिकेने हाती घेतलेल्या अँटिजेन टेस्ट मोहिमेत सर्वपक्षीय नगरसेवक सहभागी झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. अनेकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांची टेस्ट करुन घेण्याचा सपाटा लावला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचे विलगीकरण करुन संसर्ग रोखण्यासाठी मनपाने १५ नागरी आरोग्य केंद्रातून अँटिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राला उद्दिष्ट देण्यात आले आहे. या टेस्टमध्ये अर्ध्या तासात रुग्णाचा अहवाल मिळतो. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे नाहीत. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आपल्याला आणि कुटुंबाला क्वारंटाईन व्हावे लागेल, असे अनेक नागरिकांना वाटते. यामुळे अनेक नगरसेवकही बावरुन गेले होते; मात्र एकदाचा कोरोना संसर्गाचा धोका दूर होईल हे लक्षात आल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात ही टेस्ट व्हावी यासाठी आग्रह धरला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी आपल्या प्रभागात ६५० हून अधिक नागरिकांची टेस्ट करुन घेतली. कोठे यांनी आयोजित केलेले शिबीर आणखी दोन दिवस चालणार आहे.
भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी यांनी हनुमान मंदिरात शिबिराचे आयोजन केले. या ठिकाणी १०० नागरिकांची टेस्ट करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता रोटे यांच्या वतीने प्रभाग २३ मध्ये शिबीर घेण्यात आले. नगरसेवक अमित पाटील, जगदीश पाटील यांच्या पुढाकारातून बुधले गल्ली, बाळ गणपती सभागृहात अँटिजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले. यात १५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. नगरसेविका फिरदोस पटेल यांनी प्रभाग १६ मध्ये शिबिराचे आयोजन केले होते. एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी आपल्या प्रभागात १०२ नागरिकांची टेस्ट करुन घेतली.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या वतीने शुक्रवारपासून विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत. रविवारी माशाळ वस्ती, महेश कॉलनी, सिंधी भवन या ठिकाणी अँटिजेन टेस्ट शिबिराचे आयोजन केले होते. चंदनशिवे यांनी गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक टेस्ट झाल्याचा दावा केला.
महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक शिवानंद पाटील यांनी माधव नगर, लेप्रसी चाळ, आदर्श नगर, इंदिरा नगर यासह विविध भागात शिबिराचे आयोजन केले. यातून ७०० जणांची टेस्ट झाल्याचा दावा पाटील यांनी केला. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या पुढाकारातून रविवार पेठेत शिबीर घेण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अँटिजेन टेस्ट आवश्यक आहे. या टेस्टबद्दल अनेक नागरिकांना शंका आहेत. या शंका दूर करण्याचे काम नगरसेवक करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही मोहीम यशस्वी होत आहे.
-डॉ. शीतलकुमार जाधव,
आरोग्य अधिकारी, मनपा