मतमोजणीदिवशी लहान इरण्णा वस्तीमध्ये असते अघोषित संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:54 PM2019-05-21T12:54:11+5:302019-05-21T12:59:26+5:30
रामवाडी गोदामातील निवडणूक मतमोजणीचा दिवस : वाढत्या तापमानात कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे घरात बसणेही मुश्कील
संजय शिंदे
सोलापूर : मतमोजणीच्या दिवशी रामवाडी गोदामासमोरील लहान इरण्णा वस्तीमध्ये (मधुकर उपलप वस्ती) असते अघोषित संचारबंदी... समोरच्या बाजूने बांबूचे कठडे लावल्याने जे काही व्यवहार करायचे ते आतल्या आत... बाहेरच पडायचे तर अनेक बोळ पार करायचे... त्यातही गाडी बाहेर काढणे म्हणजे जणू परीक्षाच... एका बाजूला तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे तर दुसरीकडे विद्युत पुरवठा गोदामाकडे वळविल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे घरातील पंख्यांची गती मंदावलेली... या प्रतिक्रिया आहेत या वस्तीमध्ये राहणाºया नागरिकांच्या...
लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो वा महापालिकेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीची मतमोजणी ही सोलापुरातील रामवाडी गोदामातच होते आणि प्रत्येक मतमोजणीच्या वेळी जवळपास हेच चित्र असते.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून गोदामासमोरील रस्त्यावर वाहनांना व नागरिकांना प्रवेशबंदी असल्यामुळे या रस्त्यावर फक्त बंदोबस्ताला असलेला पोलीस फौजफाटाच असतो. गेल्या दोन दिवसांपासून लहान इरण्णा वस्तीसमोर बांबूचे कठडे उभारण्याचे काम सुरू आहे. साडेतीन ते चार हजार लोकवस्ती असलेल्या या वस्तीवर बिगारी काम, मिस्त्री काम करणारे तसेच मोलमजुरी व घरगुती काम करणाºयांची संख्या ही जास्त आहे.
सकाळी सात वाजल्यापाून ते निकाल लागेपर्यंत येथील पोझिशन टाईट असते. त्यामुळे घराबाहेर पडणे अवघडच असते, असे येथे राहणारे अर्जुन साळवे सांगतात. बिगारी काम करणारे श्रनिवास तंगडगी सांगतात की, गाडी बाहेर काढण्याच्या अडचणीमुळे मतमोजणीच्या दिवशी कामावर जात नाही. येथे सर्व पक्षांचे पाठीराखे राहतात, पण निकालाच्या दिवशी वस्तीवर आजपर्यंत कधीही गोंधळ झाला नाही, असे ते सांगतात.
किराणा दुकान उघडे, पण...
- येथील पूजा किराणा स्टोअर्सचे मालक तिमय्या तंगडगी सांगतात की, गेल्या २० वर्षांपासून ते या व्यवसायात असून, मतमोजणीच्या दिवशी कधीही आपल्याला दुकान बंद ठेवण्यास सांगण्यात आले नाही. कारण येथे हातावर काम करणाºयांची संख्या जास्त असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू ते रोजच्या रोज खरेदी करतात. पण दुकानावर जास्त गर्दी झाली की, मात्र सुरक्षा दलातर्फे लोकांना हटविण्यासाठी कडक वॉर्निंग दिली जाते.
माझं वय साठ वर्षे आहे. गोदामासमोरच घर असल्यामुळे आजपर्यंतच्या सर्व मतमोजणींची मी साक्षीदार आहे. पूर्वी मोकळे मैदान असल्यामुळे गोंधळ खूप असायचा. आता तो कमी आहे. मला निवडणुकीतील काही समजत नाही; पण मतमोजणी सुरू असताना स्पिकरवरून जी मते सांगतात. ती ऐकण्यासाठी घरातील सर्वच मंडळींचे कान गोदामाकडे असतात व तेच मला निवडणुकीचा निकाल सांगतात.
- पार्वतीबाई केंचनाळकर
रहिवासी