विठ्ठलाच्या दर्शनासाठी बनावट आधारकार्डाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:55 PM2019-09-27T12:55:33+5:302019-09-27T12:59:01+5:30
पंढरपूर; सुरक्षा कर्मचाºयांनी उजेडात आणला प्रकार
सचिन कांबळे
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी बनावट आधारकार्डाचा आधार बाहेरील भाविक घेत असल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी सागर तुकाराम बोरगे यांनी उघडकीस आणला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी रोज राज्यभरातून हजारो भाविक येतात. यामुळे भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी तासन्तास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. स्थानिक नागरिकांना मात्र विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी मंदिर समितीकडून पहाटे एक तास सभामंडपातून दर्शनासाठी सोडण्यात येते. यावेळी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी दर्शनासाठी येणाºया स्थानिक नागरिकांच्या आधारकार्डाची तपासणी करतात. त्यानंतरच त्यांना सोडतात़ परंतु बाहेरगावचे भाविक बनावट आधारकार्ड वापरून विठ्ठलाच्या दर्शनाला जात असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल वामनराव यलमार यांना बातमीदाराकडून मिळाले होती.
यानुसार यलमार यांनी सुरक्षा कर्मचारी सागर तुकाराम बोरगे यांना दर्शनासाठी येणाºया नागरिकांचे आधारकार्ड तपासण्याची सूचना दिली. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील आधारकार्ड तपासण्याचे काम सुरू होते. यावेळी मंदिरातील सुरक्षा कर्मचारी सागर तुकाराम बोरगे यांना संशय आल्याने त्यांनी एकाकडे अधिक चौकशी केली. यावेळी त्या आधारकार्डावर पत्ता खोटा असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्या ठिकाणी ८ ते १० भाविकांनी मंदिरातच आधारकार्ड टाकून पलायन केले. मिळालेल्या त्या आधारकार्डावरून ते भाविक बाहेरगावचे असून, त्यांना शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत़