दूध अन् तेलावर भेसळखोरांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:27+5:302021-08-18T04:28:27+5:30
सोलापूर : घराघरातल्या किचनमध्ये हल्ली दूध अन् तेलाशिवाय पानच हलत नाही. आणि नेमकं यावरच भेसळखोरांचं लक्ष वेधलं जातं. अन्न ...
सोलापूर : घराघरातल्या किचनमध्ये हल्ली दूध अन् तेलाशिवाय पानच हलत नाही. आणि नेमकं यावरच भेसळखोरांचं लक्ष वेधलं जातं. अन्न व औषध प्रशासन विभागाची यावर करडी नजर असते. गतवर्षी २०१९-२० मध्ये टाकलेल्या छाप्यात घेतलेल्या ४१३ नमुन्यांमध्ये ७७ ठिकाणी भेसळ आणि कमी दर्जा आढळला. चालू वर्षी २०२०-२१ मध्ये जुलैअखेर ५८२ नमुन्यांपैकी २६ ठिकाणी हे प्रमाण आढळले आहे. या भेसळखोरांपासून ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.
आहारात घेतल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांतील भेसळीमुळे त्याचा थेट आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून वर्षभर छापे टाकून त्या रोखण्याचे काम केले आहे. गत आणि चालू वर्षी दुधात अधिक भेसळ आढळून आली. २०२० मध्ये दुधाचे ९६ नमुने तपासणीसाठी घेतले. त्यामध्ये १ असुरक्षित आणि २२ कमी दर्जाचे आढळले. चालू वर्षी ९२ पैकी १ नमुना कमी दर्जाचा आढळून आला, तर पाच नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
आजवर टाकण्यात आलेल्या छाप्यांचा आढावा लक्षात घेता प्रामुख्याने दूध, त्यानंतर खाद्यतेल, खवा, तूप, गूळ, हळद, मधामध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे.
——-
भेसळ किती
कधी घेतलेले नमुने किती
२०१९-२० ४१३ ७७
२०२०-२१ ५८२ २६
———
खरेदी करताय, अशी घ्या काळजी
बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचे पॅकिंग व्यवस्थित आहे का? एक्सपायरी डेट किती आहे. प्रमाणित केल्याचे नमूद आहे का? या बाबी तपासून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खरेदी करताना चोखंदळपणे पाहणे आवश्यक असल्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून केले जाते.
——
या काळात होते अधिक भेसळ
- साधारणत: श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. नागपंचमी, गणेश चतुर्दशी, गौरी गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये दुग्धजन्य मिठाईचे पदार्थ, लाडू, चकल्या, गूळ, बेसन अशा अनेक पदार्थांना मागणी असते. ग्राहकांची खरेदीसाठी असणारी गर्दी लक्षात घेऊन भेसळ मोठ्या प्रमाणात होते. ग्राहक नेमका इथेच फसतो. या काळात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
——
कशी ओळखावी भेसळ
- अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्याचे घरगुती साधे उपाय असल्याचे अन्न विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. चवीवरून दुधातील भेसळ ओळखता येते. फॅट वाढविण्यासाठी दुधात साखर, युरिया, मीठ, गोडेतेलाची भेसळ केली जाते. प्रोटीन वाढविण्यासाठी मिल्क पावडर, स्वाबीटाॅल, पॅराफिन, गुल्कोज हे घातक रसायन वापरले जाते. प्रयोगशाळेतच याची तपासणी होते. हळदीत हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकल्यास ते निळे झाल्यास भेसळ आहे असे ओळखावे. शुद्ध मध लगेच पेट घेते. तेलात पामतेल मिसळले जाते.
-----
आपल्याकडे प्रामुख्याने दूध, पेढा, खवा, गोडेतेल, हळद यामध्ये भेसळ आढळते. दूध व खव्यातील भेसळ शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन कारवाया केल्या जातात. ग्राहकांनी खरेदी करताना भेसळीचा संशय आल्यास आमच्या विभागाकडे संपर्क साधावा.
- प्रदीप राऊत, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन
----