Good News; उजनी ते सोलापूर पाईपलाईनसाठी तीन तालुक्यांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:56 PM2020-06-30T12:56:26+5:302020-06-30T12:58:17+5:30
स्मार्ट सिटीचे काम; कंपनीचे सीईओ पी. शिवशंकर यांचा निर्णय
सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनच्या कामासाठी तीन तालुक्यातील जमिनीचे तात्पुरते संपादन होणार आहे. या क्षेत्राचे सीमांकन आणि गावठाण मोजण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे सीईओ पी. शिवशंकर यांनी घेतला आहे.
स्मार्ट सिटी योजना, एनटीपीसी आणि महापालिकेच्या माध्यमातून उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेच्या जुन्या पाईपलाईनच्या बाजूनेच नवीन पाईप टाकण्यात येणार आहेत. नवी पाईपलाईन जमिनीखालून असेल. यासाठी उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील क्षेत्राचे तात्पुरते संपादन होणार आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तीन तालुक्यातील क्षेत्राची फेब्रुवारी महिन्यात मोजणी सुरू झाली. मार्च महिन्यात बहुतांश काम पूर्ण होत असताना लॉकडाऊन जाहीर झाले. तीन महिने बंद असलेली मोजणी चार दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.
यादरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत जुन्या पध्दतीने सीमांकन निश्चित करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने काम करावे, अशी सीईओ पी. शिवशंकर यांनी मांडली. जुन्या पध्दतीने काम केल्यास बराच उशीर लागतो. काही त्रुटी राहू शकतात. ड्रोनद्वारे मोजणी केल्यास कमी कालावधीत जास्त काम होईल. एका दिवसांत एका गावातील मोजणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तसा नवा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले.
शिवशंकर यांचा परभणी पॅटर्न
संगणक अभियंता असलेले पी. शिवशंकर परभणीचे जिल्हाधिकारी होते. खाण उद्योगातील अवैध प्रकार रोखण्यासाठी त्यांनी खाणींची ड्रोनद्वारे मोजणी करून घेतली होती. यातून नेमकी किती खोलवर खोदाई झाली, याची माहिती समोर आली होती. आता समांतर पाईपलाईनचे काम करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ड्रोनची खरेदी करावी. हा ड्रोन आगामी काळात महापालिकेतील विविध कामांसाठी वापरता येईल. पाईपलाईनच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या व्यक्तीचे सहकार्य घेता येईल. त्यानंतर महापालिकेतील कर्मचाºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
शेतकºयांना बजावल्या नोटिसा
समांतर पाईपलाईनच्या कामासाठी मनुष्यबळाच्या सहायाने मोजणी सुरू झाली आहे. यापूर्वी क्षेत्राचे व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले आहे. भरपाई देताना त्याची मदत होणार आहे. यासंदर्भात शेतकºयांना नोटिसा देण्यात येत आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळून, लोकांची गर्दी होऊ नये अशा पध्दतीने काम सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले.