देशाच्या रक्षणकर्त्यांना सोलापूरातून एक लाख राख्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:53 PM2018-08-14T15:53:53+5:302018-08-14T15:59:36+5:30
रक्षा बंधन : जुळे सोलापूर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
सोलापूर :
आओ झुककर करे सलाम उन्हे।
जिनके हिस्से मे ये मुकाम आता है
कितने खुश नसीब है वह लोग।।
जिनका खुन वतन के काम आता है ।।
असा संदेश देत ख्वाजा बंदे नवाज उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांसाठी राख्या तयार करून दिल्या आहेत. जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ३0 शाळांमधून १ लाख राख्या संकलित झाल्या असून, त्या सर्व राख्या जवानांना पोहोचविल्या जाणार आहेत.
बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखीपौर्णिमा़ म्हणजे प्रत्येक बहीण आपल्या घरात भावाला राखी बांधून साजरी करते, मात्र देशाच्या रक्षणासाठी २४ तास सीमेवर तैनात असलेल्या जवानांना याची उणीव भासू नये म्हणून जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकल व सचिव पल्लवी तडकल यांनी हा उपक्रम हाती घेतला होता.
विद्यार्थिनींनी स्वत:च्या हाताने घरात राख्या तयार केल्या. या राख्यांवर आपला संदेश देत भावना व्यक्त केल्या आहेत. या राख्या १४ आॅगस्ट रोजी ९ बटालियनचे कर्नल प्रमोदकुमार रावत, कर्नल सुधीर शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी शांती इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए.जी. पाटील उपस्थित राहणार आहेत. राख्या अहमदनगर येथील लष्करी कॅम्प नंतर पुणे येथील लष्करी कॅम्पमध्ये जाऊन तेथून सीमेवरील १ लाख जवानांपर्यंत पोहचणार आहेत.
सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना हे सैनिक राखीपौर्णिमेच्या सणाला येऊ शकत नाहीत. सीमेवर आपले रक्षण करणाºया भावाला उदंड आयुष्य लाभावे म्हणून विद्यार्थिनींनी मनापासून राख्या तयार केल्या आहेत. या राख्या जवानांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेमार्फत करीत आहोत.
-पल्लवी तडकल, सचिव, जुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवा संस्था, सोलापूर.