कोरवलीत डॉक्टर बंधूंनी केले सत्तापरिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:20 AM2021-01-21T04:20:54+5:302021-01-21T04:20:54+5:30
कामती : मोहोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरवली ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले आहे. डॉ. अमोल पाटील यांच्या अमोगसिद्ध लोकशक्ती ...
कामती : मोहोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरवली ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले आहे. डॉ. अमोल पाटील यांच्या अमोगसिद्ध लोकशक्ती पॅनल विरुद्ध राजशेखर पाटील यांचा अमोगसिद्ध ग्रामविकास पॅनल अशी दुरंगी लढत झाली. डॉक्टर अमोल पाटील गटाने ११ पैकी ९ जागा जिंकत सत्ता खेचून आणली. विशेषत: लॉकडाऊन काळात कोरोनाग्रस्तांची सेवा केल्याची गावाने दखल घेतली.
या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी ग्रामस्थांना पारंपरिक आश्वासने न देता आधुनिक विकासाचे व्हिजन समोर ठेवून गावातील सुशिक्षित तरुण वर्गाला एकत्रित केले. गावाच्या विकासासाठी सुशिक्षित तरुणांना उमेदवारी देऊन विजयी करून आणले.
डॉ. अमोल पाटील हे पोट विकारतज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्रात उच्चविद्याविभूषित तरुण आहेत. सोलापूर येथे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. गावाच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड असते. आरोग्यसेवेबरोबर दर रविवारी गावी येऊन ते गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास अग्रेसर असतात. या कामात त्यांचे बंधू डॉ. राहुल पाटील व वहिनी डॉ. सारिका पाटील यांचीही साथ असते.
कोरोना काळात या डॉक्टर परिवाराने ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून काम केले. याची जाण ठेवत गावकऱ्यांनी त्यांना संपूर्ण गावाची सेवा करण्याची संधी दिली. कोरवली ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षांपासून राजशेखर पाटील यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत डॉ. अमोल पाटील यांनी गावाच्या विकासासाठी गावातील सुशिक्षित तरुणांना एकत्रित आणले. ११ पैकी ९ जागा जिंकत सत्ता परिवर्तन करवून सोडले, तर राजशेखर पाटील गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
----
अमोगसिद्ध लोकशक्ती गटाचे विजयी उमेदवार
प्रभाग एक : उमेदवार सिद्धेश्वर म्हमाणे, अमोल गेंगाणे, आशा भोसले. प्रभाग दोन : सुज्ञानी पाटील, दिगंबर राजमाने, काशीबाई नंदुरे. क्रमांक तीनमधून राजशेखर पाटील गटाचे चिंगूबाई तीर्थे, अविनाश गायकवाड. प्रभाग चार : प्रीती पाटील, रोहिणी तारके, शशिकांत रंगसिद्ध कस्तुरे.