नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम द्विगुणित करणारा ‘कपल चॅलेंज’ सोशल मिडियावर फेमस
By Appasaheb.patil | Published: September 23, 2020 12:06 PM2020-09-23T12:06:12+5:302020-09-23T14:52:37+5:30
सोशल मिडियावर नवा ट्रेंड; नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद...
सुजल पाटील
सोलापूर : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंडचा सपाटा सुरु आहे़ नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा, दोघांमधील प्रेम द्विगुणित करणारा ट्रेंड सोशल मीडियावर गाजत आहे़.
सोशल मीडियावर यापूर्वी एकमेकांना अनेक चॅलेंज देण्याचे ट्रेंड झाले़ मात्र सध्या कोरोनाच्या लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ आता लॉकडाऊननंतर नव्याने आयुष्य जगणाºया नेटिझन्सने ‘चॅलेंज कपल’ ही अनोखी स्पर्धा सुरू केली़ या स्पर्धेत सोशल मीडियावरील मित्र आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा पत्नीसोबत काढलेला फोटो फेसबुकवर शेअर करून आपल्या जवळच्या दहा ते पंधरा मित्रांना चॅलेंज करतात़ त्यानुसार त्या नेटिझन्सचे मित्र ते चॅलेंज स्वीकारून स्वत:च्या पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो शेअर करून पुन्हा चॅलेंज करतात़ अशाप्रकारे एकमेकांना चॅलेंज करून आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करण्याची सोशल मीडियावर स्पर्धा लागली आहे.
दरम्यान, अल्पावधीतच हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे़ फेसबुकवर स्क्रोल केलं तर सगळीकडे ‘चॅलेंज कपल’ हेच दिसून येत आहे़ या स्पर्धेत नवविवाहित युवक, युवतींसह ज्येष्ठांचाही समावेश आहे़ काहींनी आपल्या परिवारासोबतचा फोटो शेअर करून चॅलेंज केले आहे़ हा ट्रेंड कसा सुरू झाला, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.
-------------
नवरा-बायकोमधील प्रेम होतंय अतूट...
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसºयांना चॅलेंज दिलं तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. कपल चॅलेंजबाबतही तसंच झालं आहे. कोणताही विचार न करता अनेक जण हे चॅलेंज स्वीकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणारे मित्र आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर करून एकमेकांना चॅलेंज करीत आहेत़ या चॅलेंजच्या माध्यमातून नवरा-बायकोमधील प्रेम अधिक अतूट होत असल्याचे नेटिझन्स व वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुले यांनी सांगितले़
--------------
विवाह न झालेले नेटिझन्स नाराज़...
कपल चॅलेंजच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो प्रत्येक जण फेसबुकवर शेअर करीत आहे़ त्यामुळे ज्या नेटिझन्सचे वय झाले आहे मात्र लग्न झाले नाही अशांनी या चॅलेंजवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकाने फेसबुकवर ‘ते कपल चॅलेंजसारखं सिंगल चॅलेंज पण ठेवता येतंय का? बघाकी, जरा.. अखिल भारतीय सिंगल संघटना’ अशी पोस्ट टाकून या चॅलेंजबद्दल नाराजी व्यक्त केली आहे़
----------