शेतात बैलजोडी घातल्याने दांपत्यावर कुऱ्हाडीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:25+5:302021-07-04T04:16:25+5:30
करमाळा : राजुरी येथे शेतात बैलजोडी घालून नुकसान केल्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीने हल्ला चढवून पती- पत्नीला गंभीर जखमी केले. शुक्रवारी ...
करमाळा : राजुरी येथे शेतात बैलजोडी घालून नुकसान केल्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीने हल्ला चढवून पती- पत्नीला गंभीर जखमी केले. शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ बाळासाहेब साखरे (वय २६, रा. राजुरी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. साखरे यांची राजुरी शिवारात साडेबारा एकर जमीन आहे. शेजारी विठ्ठल दादा साखरे यांची जमीन आहे. या दोघात सामाईक शेतीबांध आहे. याच शेतीबांधाच्या वहिवाट कारणावरून विठ्ठल साखरे व त्याची मुले मनोज साखरे, लहू साखरे व अंकुश साखरे हे नेहमी त्रास देतात.
शुक्रवारी एकनाथचे आई व वडील उसात औषध फवारणी करीत होते. त्यांना एकनाथ मदत करीत होता. औषध व खत संपल्याने तो राजुरीतून आणायला गेला. काही वेळात औषधे व खत घेऊन परतला तेव्हा भावकीतील विठ्ठल साखरे, मनोज साखरे, लहू साखरे, अंकुश साखरे व एक महिला हे शेतामधून बैलजोडीच्या साहायाने ऊस बांधणीचे काम करीत होते. तेव्हा सामाईक बांधावरून वाद रंगला आणि हे शेतात येऊन बैलजोडी वळवत होते. उसाचे नुकसान होत असल्याने एकनाथच्या आई वडिलांनी त्याला विरोध केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार रणदिवे हे करत आहेत.
----
सामाईक बांधावरुन मारहाण
सामाईक बांधावरुन झालेल्या या वादात मनोज साखरे याने कुऱ्हाडीने बाळू साखरे यांच्या डोक्यावर मारले. तसेच लहू साखरे व अंकुश साखरे यांनी गजाने डोक्यात मारुन प्राणघातक हल्ला चढविला. तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा हिला देखील लहू साखरे व अंकुश साखरे यांनी बेदम मारहाण केली. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना तेथून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
----