महिना दीड लाख पगार असलेल्या दाम्पत्यांचा दीड महिन्यात घटस्फोट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 12:49 PM2022-05-24T12:49:13+5:302022-05-24T12:49:19+5:30
सोलापूर न्यायालयाचा निर्णय; स्वभाव एकमेकांना पटत नसल्याचे कारण
सोलापूर : सोलापूरमध्ये स्थायिक असलेले मात्र पुण्यातील मोठ्या कार्पोरेट कंपनीत नोकरीला असलेल्या पती-पत्नीचा कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी घटस्फोट याचिका अर्ज मंजूर केला. दोघांचा स्वभाव एकमेकांना पटत नसल्यामुळे ते गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत होते.
पत्नी वंदना (वय २६, रा. हाेटरी रोड) व पती महेश (वय ३० रा. जुळे सोलापूर) हे दोघांचे एमबीए शिक्षण झाले आहे. वंदना व महेश दोघेही पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करीत होते. ओळखीने दोघांचा विवाह नोव्हेंबर २०२० मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पती-पत्नीचा स्वभाव जुळत नव्हता. क्षुल्लक व किरकोळ कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. दोघांनी पूर्ण विचारांती सहसंमतीने घटस्फोट घेण्यासाठी ॲड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत, सोलापूर येथील हिंदू विवाह कायदा १९५५ कलम १३ बी प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च २०२२ मध्ये दाखल केली होती.
दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण-घेवाण नाही. दोघे उच्च द्विपदवीधर आहेत. दोघांना एक लाख ते दीड लाख पगाराची नोकरी आहे. पत्नीला दुसरे स्थळ आले आहे. त्यामुळे सहा महिने थांबणे शक्य नाही असा युक्तिवाद ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी घटस्फोट मंजूर केला. याप्रकरणी पत्नी वंदना व पती महेश या दाम्पत्यातर्फे ॲड. श्रीनिवास कटकुर, ॲड. किरण कटकुर आणि ॲड. आनंद सागर यांनी काम पाहिले.