माचणूरच्या सरपंचाचे धाडस; भीमा नदी पात्रात बुडणाºया चौघांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:02 PM2019-11-05T13:02:10+5:302019-11-05T13:08:01+5:30
भीमा नदीत बुडणाºया चौघांना जीवदान; माचणूरचे सरपंच सुनील पाटलांनी केलं धाडस
मंगळवेढा : तालुक्यातील माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासोबत भीमा नदीत मासे आलेत का हे पाहण्यासाठी गेले़ ते दोघे नदीच्या माचणूरकडील बाजूने जात असताना मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे शब्द कानी पडले़ चार तरूण दुथडी भरलेल्या नदीपात्राच्या प्रवाहात बुडत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी कशाचाही विचार न करता एकेक करीत त्या चौघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़
रविवारी दुपारी चार दुचाकीवरून आठ तरूण पोहण्यासाठी अर्धनारीजवळील बंधाºयाजवळ गेले़ त्यांनी भीमा नदीच्या तीरावर दुचाकी लावून पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले़ दरम्यान, चौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़ तेव्हा मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे ओरडू लागले.
दरम्यान, माचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होते़ त्यांना त्या तरुणांचा आवाज कानी पडला़ सुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़ स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पोहत जाऊन पाण्याच्या प्रवाहातून त्या चौघांना बाहेर काढले़ त्यांच्या पोटातून पाणी काढले़ ते शुद्धीवर आल्यानंतर माझ्या पाया पडू लागले, पण मी त्यांना असे करू नका, जीव वाचला हेच महत्त्वाचे आहे, असे सांगून शांत केले. त्यानंतर वेगवान पाण्याच्या प्रवाहात जास्त पोहल्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता़ हात आणि पाय दुखत असल्याने त्या ठिकाणी न थांबता मी थेट घरी येऊन झोपी गेलो ते सोमवारी सकाळी ८ वाजताच उठलो. ते तरुण कुठले होते, कशासाठी आले होते, याची काहीही माहिती मी जाणून घेतली नाही. केवळ त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते, ते काम मी केल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत १०० जणांना वाचविले
- गावच्या शेजारीच नदी असल्याने पाचवीला असताना पोहायला शिकलो़ त्यानंतर पाण्यात कोण बुडत असल्याचे दिसताच त्यांचा जीव वाचविण्याचे काम केले़ आतापर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त व्यक्तींना वाचविले आहे़