कोविड सेंटर रुग्णांसाठी सज्ज, मात्र बाधितांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:03+5:302021-05-18T04:23:03+5:30
मोडनिंब : बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांतून कोविड सेंटर उभारले खरे, मात्र भीती, गैरसमज यातून अनेक बाधितांनी या ...
मोडनिंब : बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांतून कोविड सेंटर उभारले खरे, मात्र भीती, गैरसमज यातून अनेक बाधितांनी या केंद्रात उपचार घेण्याकडे पाठ फिरवली आहे.
सध्या स्वामी समर्थ मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथे उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची क्षमता ७० असताना येथे केवळ सहा बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात इतर केंद्रांच्या तुलनेत विरोधाभासाची स्थिती येथे पाहायला मिळत आहे.
सध्या मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये दररोज जवळपास २५ बाधित रुग्ण सापडत आहेत. मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, भेंड, बावी, सोलंकरवाडी, वरवडे ही गावे प्रभावित झाली आहेत. मात्र, बाधित आढळल्यानंतर अनेकांनी गैरसमज, भीती आणि सेल्फ आयसोलेशनच्या नावाखाली मोडनिंबमधील उपचार केंद्राकडे पाठ फिरवली आहे. लॉकडाऊनच्या १५ दिवसांत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या केंद्रात चहा, नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली असतानाही रुग्ण येथे येण्यास टाळाटाळ करत आहेत.
या संदर्भात कानोसा घेतला असता येथील कोविड सेंटरमध्ये दोन शौचालये, दोनच बॉथरूम आहेत. शिवाय, येथे श्वास गुदमरल्यासारखे होते म्हणून येथे दाखल होऊन उपचार घेण्यास कोणी धजावत नसल्याची कारणे काही रुग्णांशी संवाद साधताना ऐकावयास मिळाली.
----
सेल्फ आयसोलेशनला प्राधान्य
याबाबत कोरोना समितीच्या सदस्य सरपंच मीना शिंदे यांच्याशी संवाद साधला असता, रुग्णांना सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आरोग्य विभाग व पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शरद थोरात यांच्याशीही संवाद साधला असता, रुग्ण सेल्फ आयसोलेशनला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.
----
फोटो : १६ मोडनिंब
मोडनिंब येथील कोविड सेंटरची क्षमता ७० असताना केवळ सहा बाधितच याठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे उपचार केंद्र ओस पडले आहे.