कोविड रुग्णाच्या अंत्यविधीसाठी मोजावे लागतात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:45+5:302021-04-27T04:22:45+5:30
माळशिरस तालुक्यात अकलूज हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी जवळपास दीडशेपर्यंत मोठी हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी सर्व ...
माळशिरस तालुक्यात अकलूज हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी जवळपास दीडशेपर्यंत मोठी हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल असल्याने पंढरपूर, सांगोला, इंदापूर, माढा आदी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी काही हॉस्पिटल नि:स्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. पण काही हॉस्पिटल मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याप्रमाणे काम करत आहेत.
अकलूज येथे दररोज कोविडचे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोविड रुग्णांना नातेवाईक हात लावत नाहीत. त्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे काम दिले आहे. अकलूजमध्ये मृत रुग्णाच्या अंत्यविधीची जबाबदारी अकलूज ग्रामपंचायतीवर आहे. या ठिकाणी एक टोळी कार्यरत आहे. यामध्ये एक ॲम्बुलन्सवाला, अंत्यविधी साहित्य गोळा करणारा, नातेवाइकांकडून अंत्यविधीचे पैसे घेणारा असे चार ते पाच जण कार्यरत आहेत. या लोकांना हॉस्पिटलमार्फत संपर्क केला जातो. त्यानुसार अंत्यविधीसाठी किती पैसे द्यायचे हे ठरवले जाते, अशी माहिती एका रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितली. याबाबत अकलूजच्या प्रांताधिकारी शमा पवार यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाइल बंद लागला. त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
कोट ::::::::::::::
कोविड रुग्णांचा अंत्यविधी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्यामार्फत केले जाते. याबाबत प्रांताधिकाऱ्याकडे तक्रारी आल्या आहेत. तेच याबाबत कारवाई करतील.
- डॉ. रामचंद्र मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी
कोट :::::::::::::::
अकलूजमध्ये सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल आहेत. कोविड रुग्णांच्या नातेवाइकांकडून अंत्यविधीसाठी कोणतेच पैसे घेतले जात नाहीत. आमच्याकडे कोणतीच याबाबत तक्रार नाही.
- डॉ. संतोष खडतरे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, अकलूज