सोलापूरच्या खादी ग्रामोद्योगकडून १० कोटींवर पतपुरवठा, साडेचार हजारांना व्यवसाय, पंतप्रधान रोजगार योजनेच्या उद्दिष्टात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:02 PM2017-11-18T13:02:43+5:302017-11-18T13:05:04+5:30
महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे.
देशात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात २००८-०९ पासून झाली. या योजनेसाठी सोलापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाला २०१६-१७ पर्यंत ४२६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात सहा कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. या कार्यालयाने उद्दिष्टापुढे जात ६७५ लाभार्थ्यांना या काळात नऊ कोटी ४८ लाख ९७ हजार रुपयांचा पतपुरवठा बँकांमार्फत केला.
विशेष घटक योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध या घटकांकरिता २०११ ते २०१६-१७ या काळासाठी दोन हजार ३१८ लाभार्थ्यांच्या रोजगारपूर्तीसाठी दोन कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचे भौतिक उद्दिष्ट देण्यात आले होते. या काळात एक हजार २०३ लाभार्थ्यांना एक कोटी २० लाख सात हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात या कार्यालयाला यश आले. विशेष घटक योजनेत उद्दिष्टपूर्ती नसली तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर कार्यालयाचे काम चांगले असल्याची आकडेवारी आहे. लाभार्थी अनुसूूचित जाती आणि नवबौद्ध समाज घटकातील दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गातून निवडायचे असल्याने जातीचा दाखला, रहिवासी दाखला ही कागदपत्रे मिळविताना लाभार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे ही स्थिती सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात आहे.
मधुमक्षिका पालन उद्योगातूनही या कार्यालयाने २०१५-१६ ते १७-१८ या काळात ४६५ शेतकºयांना प्रशिक्षण दिले असून आत्मा योजनेच्या अंतर्गत हे काम सुरू आहे. आत्मा योजनेतून लाभार्थ्याला ४० ते ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
२०१७ पासून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी २५ लाख तर सेवा उद्योगासाठी १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यात महिला, अपंग, मागास जाती प्रवर्ग, माजी सैनिकांना ३५ टक्के तर इतरांना २५ टक्के सबसिडी मिळते. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी कमिशन आयोग या तीन एजन्सीमार्फत ही योजना राज्यात राबविली जाते.
--------------------------
मंडळाचे कार्य
राज्यातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकास कार्यासाठी १९६२ मध्ये महाराष्टÑ खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. ग्रामीण क्षेत्रातील गरजूंना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर आणि बलुतेदारांना स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक वृद्धी, उद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांच्या तांत्रिक कौशल्य वाढीसाठी उत्तेजन, मालाच्या विक्रीसाठी मदत आणि प्रशिक्षण आदी उद्दिष्टांसाठी हे मंडळ कार्य करते.
--------------------------
जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत चालविण्यात येणाºया या कार्यालयाच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि विशेष घटक योजनांतून पारंपरिक आणि लघुउद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. मधमाशा पालन उद्योगातूनही शेतकरी आणि ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्नही करतो. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी लाभार्थी आॅनलाईन अर्ज करू शकतात.
- डी. एस. भोसले
जिल्हा खादी
ग्रामोद्योग अधिकारी, सोलापूर.