जास्त असताना वय कमी दाखविल्यास क्रिकेट खेळाडूंवर आता तीन वर्षाची बंदी
By Appasaheb.patil | Published: May 11, 2024 01:18 PM2024-05-11T13:18:09+5:302024-05-11T13:18:27+5:30
संघटनेने खेळाडूंना पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी स्वेच्छेने स्पर्धेतून त्वरीत माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.
सोलापूर : जास्त वय असताना कमी वयाची कागदपत्रे दाखवून स्पर्धेत उतरणाऱ्या क्रिकेट खेळाडूंवर तीन वर्षाची बंदी घालून तातडीने दंड ठोठाविण्याबाबतचा निर्णय नुकताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भात देखरेख व पडताळणी करण्यासाठी एक समितीची नेमणूक करण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयासंदर्भातील पत्र सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला प्राप्त झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेतील काही खेळाडू हे जास्त वयाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या नियम आणि नियमांचे उल्लंघन होत झाल्याची बाब असोसिएशच्या निर्दशनास आल्यानंतर संघटनेने खेळाडूंना पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी स्वेच्छेने स्पर्धेतून त्वरीत माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे कोणताही खेळाडू जास्त वयाचा असल्याचे आढळून आल्यास 'एमसीए' त्या खेळाडूस कोणत्याही श्रेणीतील सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तीन वर्षाची बंदी घालून दंड ठोठाविणार असल्याचे सांगण्यात आले. यापुढील काळात खेळाडू, क्लब, व पालकांनी एखाद्या खेळाडूचे करिअर खराब होणार याबाबतची काळजी घ्यावी असेही आवाहन सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले आहे.