संयुक्त चौकातला क्रिकेट स्कोअर बोर्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:05+5:302021-09-25T04:22:05+5:30
१९७१ चा काळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजित वाडेकर आपल्या संघासमवेत वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर तोंड देत होता. या निकराच्या ...
१९७१ चा काळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजित वाडेकर आपल्या संघासमवेत वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर तोंड देत होता. या निकराच्या झुंजीसाठी एका तरुण चुणचुणीत मुलाची भर पडली. ते नाव होतं सुनील गावसकर. त्याचा हा पदार्पणातला पहिलाच सामना होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये तीन सामने अनिर्णीत अवस्थेत होते. चौथ्या सामन्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली होती. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २१४ धावा केल्या. पहिल्याच डावात भारताने १३८ धावांची आघाडी घेतली. दुसरा डावा सुरू झाला. वेस्ट इंडिजला २६१ धावसंख्येवर रोखण्यात भारताच्या फिरकीपटूंनी यश मिळवलं.
सोलापुरात या सामन्याबद्दल उत्सुकता ताणलेली. विजयासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले. प्रत्येक चेंडूवर क्रिकेट रसिकांना उत्सुकता. त्याकाळी टीव्ही तर नव्हताच अन् रेडिओही फार कमी लोकांकडे होता. अशावेळी त्यावेळी १५ वर्षांच्या दीपक मुनोत या क्रिकेटवेड्या विद्यार्थ्यानं सध्याच्या सोमवार पेठेतल्या संयुक्त चौकात जसा स्टेडियममध्ये स्कोअर बोर्ड असतो अगदी तसा बोर्ड लावून सोलापूरकर क्रिकेट रसिकांची सामना अनुभवण्याची हौस भागवली. या स्कोअर बोर्डवर मैदानात होणाऱ्या प्रत्येक घडामोडींचे अपडेट दर चेंडूला बदलले जायचे. मुनोत यांचे चौकातच दुकान होतं. तेथे रेडिओ काॅमेंट्री ऐकून तत्काळ बदल केलं जायचे. शे-दोनशे क्रिकेट रसिक संयुक्त चौकात गर्दी करून स्कोअर बोर्डकडे लक्ष ठेवून असायचे. चौकार, षटकारची बरसात झाली रे झाली की टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज घुमायचा. विशेष म्हणजे त्यावेळी वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना भारतानं जिंकला. सुनील गावसकरांनी पदार्पणातच पहिल्या डावात ६५ आणि ६७ धावा काढून आपलं अस्तित्व दाखवून दिलं.
हा सारा आँखो देखा हाल संयुक्त चौकात उभा केला तो दीपक मुनोत यांनी. १२ बाय १५ साईजचा मोठा फलक संयुक्त चौकातल्या हॉटेल गजाननच्या वरील बाजूला बसवलेला असायचा. याच चौकात दीपक मुनोत यांचं घर होतं. त्यांचे वडील कै. नारमल मुनोतदेखील क्रिकेटवेडे. घरातल्या गॅलरीत रेडिओची कॉमेंट्री ऐकायचे आणि हातवारे करून दीपक चौकार, षटकार, एक, दोन धावा, बाद याबद्दल माहिती सांगायचे आणि स्कोअर बोर्डवर अपडेट दिसायचे. खाली चौकात मग जल्लोष व्हायचा. या जुन्या आठवणींना मुनोत यांनी उजाळा दिला अन् मन भूतकाळात रमून गेलं.
१९७१ साली सुरू झालेला स्कोअर बोर्डचा अनोखा उपक्रम पुढे १६ वर्षे चालला. म्हणजे १९८७ साली टीव्हीचा प्रसार झाला आणि लोकांना मैदानावरील थेट प्रक्षेपण दिसू लागले आणि हा अनोख्या स्कोअर बोर्डचा उपक्रम थांबवावा लागला.
- विलास जळकोटकर