विनापरवाना कोरोनाची टेस्ट करणाऱ्या डाॅक्टरसह लॅबचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:30+5:302021-04-23T04:24:30+5:30
करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने जेऊरमध्ये डॉ. पांढरे व लॅब टेक्निशियन भोसले ...
करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने जेऊरमध्ये डॉ. पांढरे व लॅब टेक्निशियन भोसले हे विनापरवाना रुग्णांची टेस्ट करत आहेत. त्याप्रमाणे हिरे यांनी करमाळा पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल खैरे, उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोलीस नाईक शेख, पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांच्या पथकाने डमी पेशंट म्हणून रोशेवाडी येथील एकास कृष्णाई हॉस्पिटलमध्ये दुपारी १२ च्या सुमारास पाठवले. डमी रुग्णाची ॲन्टिजेन टेस्ट करण्याबाबत डॉ. हेमंत पांढरे यांनी भोसले लॅबोरेटरीच्या नावाने चिठ्ठी लिहून संबंधिताची टेस्ट करण्यासाठी सांगितले.
लॅबचालकाकडे वापरलेले किट व न वापरलेले किट मिळून आले. याबाबत लेखी अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सागर गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी जेऊर येथील कृष्णाई हॉस्पिटलमधील डॉक्टर व लॅबचालकावर कोविड -१९ ची टेस्ट करण्याची परवानगी नसल्याने सरकारतर्फे तक्रार दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.