वैराग पुतळाप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:25+5:302021-02-11T04:23:25+5:30
वैराग : शासनाची परवानगी न घेता वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहाटे चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्याप्रकरणी ...
वैराग : शासनाची परवानगी न घेता वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहाटे चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वैराग ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला. ग्रामपंचायत निवडणूक न झाल्याने येथे प्रशासक म्हणून एच. ए. गायकवाड व ग्रामविकास अधिकारी म्हणून सचिन श्रीराम शिंदे हे कामकाज पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी चबुतरा उभारण्यात आला. सकाळी या चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवलेला दिसला. तो पुतळा एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. याबाबत ग्रामपंचायत अधीक्षक विलास मस्के यांच्याकडे चौकशी केली असता पुतळ्याची जागा ही ग्रामपंचायतीने सन २०१० मध्ये शिवस्मारक सुशोभीकरणासाठी देण्याचा ठराव केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्या ठिकाणी सन २०१८ मध्ये पुतळा उभा करण्यासाठी चबुतरा तयार करण्यात आला; परंतु शासकीय परवानगीअभावी तो आजपर्यंत बसवण्यात आलेला नव्हता. या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी दिली गेलेली नाही. तसेच भूमी अभिलेख कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाचे दफ्तर तपासले असता पुतळा उभा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नसल्याची खात्री झाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी शेखर सावंत व तहसीलदार प्रदीप शेलार यांना या प्रकराची माहिती दिली.
वैराग येथे अनोळखी व्यक्तींनी विनापरवाना अश्वारूढ पुतळा बसवून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत वैराग ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने हे करीत आहेत.