खड्ड्यात झाड लाऊन आंदोलन केल्यानं टेंभुर्णीत खुपसे यांच्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:16+5:302021-07-21T04:16:16+5:30
टेंभुर्णी : जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी सोमवारी टेंभुर्णी येथे विनापरवानगी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावा आंदोलन ...
टेंभुर्णी : जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी सोमवारी टेंभुर्णी येथे विनापरवानगी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावा आंदोलन केल्याबद्दल टेंभुर्णी पोलिसांनी अतुल खुपसे-पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर बसस्थानकासमोर पडलेले खड्डे त्वरित बुजवून रस्ता दुरुस्त करावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अतुल खुपसे-पाटील व प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान वाहने थांबवून रस्त्यावरील खड्ड्यातच झाडे लावून आंदोलन केले.
हे आंदोलन अचानक व परवानगीशिवाय केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल अतुल खुपसे पाटील, अमोल जगदाळे (रा. अकलूज), विठ्ठल म्हस्के (रा. शेवरे) यांच्यासह पाच जणांविरोधात पोलीस नाईक पोपट गाडे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
----
लोकांच्या प्रश्नावर सरकार विरोधी आंदोलन केल्याबद्दल व प्रस्थापितांच्या दबावापोटी आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. सत्ताधारी मंत्री, आमदार यांच्या कार्यक्रमाला गर्दी झालेली पोलिसांना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सोलापूरला आले होते. तेथे गर्दी झाली तरी गुन्हा दाखल होत नाही. गांधीगिरी मार्गाने कमीत कमी लोकांना बरोबर घेऊन आंदोलन केले तर गुन्हे दाखल करतात. हे सरकार शेतकरी विरोधी असून चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न झाला आहे.
- अतुल खुपसे-पाटील
जनशक्ती शेतकरी संघटना प्रमुख