न्यायालयात आरडाओरड करणार्या दोन महिलांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:53+5:302021-09-25T04:22:53+5:30
बार्शी : बार्शी येथील न्यायालयाच्या परिसरातील जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू असताना न्यायालयाच्या समोर दोन ...
बार्शी : बार्शी येथील न्यायालयाच्या परिसरातील जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू असताना न्यायालयाच्या समोर दोन महिलांनी मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घालून शांततेचा भंग केला. कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक विलास चंदू गुदपे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी देवताबाई अनिल अदमाने (४५) व प्रियांका शंकर कसबे (२८) दोघी रा. कोईलनगर कन्हेरी रोड, लातूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनुसार या दोन्ही महिला न्यायालयात कामकाजासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी त्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या दरवाजासमोर उभे राहून आरडाओरड करत होत्या. त्यामुळे तेथे असलेले पोलीस अतुल पाटील, जगताप व शिंदे यांनी त्या दोघींना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. उलट त्यांनी मोठ्याने गोंधळ घालत आरडाओरड केली. त्यावेळी सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनीही त्यांच्या खटल्यातील प्रकरणाची माहिती दिली. तरीही गोंधळ घालू लागल्याने तेथे जमाव गोळा झाला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर हा गुन्हा नोंदला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.
------