क्राइम; पोलीस भरती करतो असे सांगून सोलापुरातील चौघांना अडीच लाखांला फसविले
By Appasaheb.patil | Published: September 2, 2022 06:42 PM2022-09-02T18:42:33+5:302022-09-02T18:42:39+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : मी पोलीस आहे, अशी बतावणी करून चौघा तरुणांना मी पोलीस भरती करतो, असे आमिष दाखवून २ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना १० मे २०२२ रोजी घडली. मात्र, त्याबाबतचा गुन्हा १ सप्टेंबर २०२२ रोजी वळसंग पोलीस ठाण्यात दाखल झाला.
मलकारसिद्ध रमेश जमादार (२८, रा. हालचिंचोली, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोपट रामचंद्र चौगुले (रा. भाळवणी, ता. सांगोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १० मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोपट चौगुले याने स्वतःस मी पोलीस आहे, अशी बतावणी करून माझ्याकडून तसेच माझे मित्र रवी जमादार, समर्थ भगत, आकाश कोळी यांच्याकडून औज येथील शेतात प्रत्येकी ६० हजार रुपये असा एकूण २ लाख ४० हजार रुपये घेऊन मी तुम्हाला पोलीस भरती करतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरवसे हे करीत आहेत.