मनिष काळजे याच्यावर खंडणी अन् धमकीचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Published: July 3, 2024 12:41 PM2024-07-03T12:41:24+5:302024-07-03T12:42:29+5:30
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कामाची निविदा मागे अन्यथा ११ लाख रुपयाची खंडणीची मागणी करुन धमकी दिल्या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (शिंदे गट) याच्यासह चालकाविरुद्ध खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याची फिर्याद ठेकेदार आकाश उत्तम कानडे (वय २३, रा. मानेगाव, ता. बार्शी यांनी दिली आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०८ (३), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये मंगळवारी रात्री ११ वाजता गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ठेकेदार आहेत. सोमवारी (१ जुलै) सकाळी ११ च्या सुमारास इंजिनिअर दीपक रामचंद्र कुंभार यांनी मनिष काळज़े याच्या सात रस्ता येथील कार्यालयात घेऊन गेले. तेथे नमूद लोकांनी फिर्यादीला एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर ७६ लाख रुपयांचे आहे. त्याच्या १५ टक्केप्रमाणे ११ लाख रुपयांची मागणी केली. यावर फिर्यादीने नकार दिल्याने त्यास दमदाटी व शिवीगाळ करुन ‘तुला काम कसे मिळते ते पाहतो. तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार’ अशी दमदाटी केली.
मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासमवेत त्यांच्या विभागाचे सहा. अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे एमआयडीसीतील कामाची वर्क ऑर्डर मंजूर झाली काय? अशी विचारणा करण्यासाठी गेले. तेथे काळजेसोबत असणारा राजेंद्र कांबळे हा तेथे होता. त्याने फिर्यादी महापालिकेत आल्याची खबर दिली. त्यावरुन काळजे आणि चालकाने तेथे येऊन फिर्यादीसह अभियंत्याशी चर्चा सुरु केली मात्र फिर्यादी ऐकत नाही असे पाहून त्याने फिर्यादीच्या तोंडावर चापटा मारल्या. सहा. कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात हा सारा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी फौजदार बनकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
सोलापुरात राहून न देण्याची धमकी
महापालिकेत अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार घडताना सोडवासोडवी करुन बाजूला केले. दरम्यान, निविदा काढून घे किंवा प्रोटोकॉलप्रमाणे मला दे’ असे म्हणत ‘तुला अख्या सोलापुरात राहू देणार नाही’ अशी धमकी देऊन मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
डीसीबी पोलीस ठाण्यात
सदरचा प्रकार हा दुपारी घडलेला असताना गुन्हा नोंदवण्यास उशीर होत असल्याच्या प्रकारामुळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे तातडीने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्याशी चर्चा होऊन गुन्हा नोंदवण्यात आला.