सहकारमंत्री देशमुखांच्या मुलाविरुद्ध सोलापुरात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:45 AM2018-11-29T06:45:16+5:302018-11-29T06:45:30+5:30

सोलापूर : लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी दूध भुकटी प्रकल्पात साडेबारा कोटींच्या अनुदानासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ...

Crime in Solapur against children of co-minister Deshmukh | सहकारमंत्री देशमुखांच्या मुलाविरुद्ध सोलापुरात गुन्हा

सहकारमंत्री देशमुखांच्या मुलाविरुद्ध सोलापुरात गुन्हा

googlenewsNext

सोलापूर : लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी दूध भुकटी प्रकल्पात साडेबारा कोटींच्या अनुदानासाठी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सुपुत्रासह नऊ संचालकांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री सदर बझार पोलीस ठाण्यात प्रभारी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी फिर्याद दिली.


फिर्यादीत म्हटले आहे की, बीबीदारफळ येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळातील रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजिनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले आणि भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १० मेट्रिक टन क्षमतेचा दूध भुकटी प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता; मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरसूची पत्र, राज्य विद्युत महामंडळाचे प्रमाणपत्र, अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र आणि कारखाना अधिनियम परवाना प्रमाणपत्र आदी कागदपत्रे बनावट तयार करून सादर केली.


२४ कोटी ८१ लाख रुपयांच्या या प्रकल्पासाठी ५० टक्के अनुदान म्हणजे १२ कोटी ४० लाख रुपये मंजूर करून घेतले. यातील पाच कोटी रुपये संस्थेचे कार्यकारी संचालक असलेल्या जिल्हा दुग्ध अधिकाऱ्यांच्या सोलापूर येथील संयुक्तिक बँक खात्यावर जमाही झाले; मात्र मंद्रुप येथील अप्पाराव गोपाळराव कोरे यांनी कागदपत्रे खोटी असल्याची तक्रार केल्यानंतर चौकशी झाली. यानुसार दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अवर सचिव राजेश गोवील यांनी याच विभागाच्या आयुक्तांना संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंगळवारी दिले. त्यानुसार बुधवारी येडगे यांनी फिर्याद दाखल केली.
 

कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास असून पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईलच. तसेच पोलिसांच्या तपासात आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.
-रोहन सुभाष देशमुख, लोकमंगल मल्टीस्टेट, सोलापूर.

Web Title: Crime in Solapur against children of co-minister Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.