सोलापूर जिल्ह्यात कॉरंटाईन कालावधीमध्ये इतरत्र फिरल्याप्रकरणी ३१ गुन्हे दाखल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 08:26 PM2020-05-31T20:26:47+5:302020-05-31T20:28:43+5:30
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची माहिती; शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे केले आवाहन
पंढरपूर : ३ मे पासून सोलापूर जिल्ह्यातील शेजारील जिल्ह्यातून राज्यातून ४६ हजार ४३९ लोक हे सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये आलेले आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम कॉरंटाईन व इन्स्टिट्यूशनलं कॉरंटाईन करण्यात आले. कॉरंटाईन कालावधीमध्ये इतरत्र फिरताना मिळून आल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात ३१ गुन्हे दाखल केल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
तसेच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी योग्य पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. कंटेनमेंट झोन मधील व्यक्ती विनापरवाना कंटेनमेंट झोनच्या बाहेर फिरताना मिळून आल्यास किंवा शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचा भंग करू नये. जो कोणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे भंग करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
या पोलिस ठाण्यात एवढे गुन्हे दाखल
- कामती : २
- बार्शी शहर : १
- माढा : २
- करमाळा : ४
- कुर्डूवाडी : ८
- टेंभूर्णी : २
- पंढरपूर तालुका : १
- करकंब : १
- पंढरपूर ग्रामीण : १
- मंगळवेढा : २
- सांगोला : ४
- बार्शी तालुका : ३